'सामना'च्या अग्रलेखातून रोहित पवारांवर कौतुकाचा वर्षाव


एएमसी मिरर : वेब न्यूज
बारामतीत नव्या पवारांचा उदय झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?’ या अमित शाह यांच्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिलेल्या उत्तरामध्ये विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत, असे म्हणत रोहित पवार यांच्याकडून देण्यात आलेल्या प्रत्युत्तराचे कौतुकही शिवसेनेकडून करण्यात आले आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हटलेय सामनाच्या अग्रलेखात, वाचा सविस्तर..

पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एका फुटीतून उभा राहिला. त्यामुळे फुटलेलेच पुन्हा फुटले. चौथ्या पवारांनी तीर मारताना आता सांगितले की, घरात आमदारकीपासून खासदारकी आलेली नेते मंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. जाडंभरडं पीठ दुसर्‍या पक्षात गेलं असे चिरंजीव रोहित म्हणतात. हे पीठ राष्ट्रवादीचे खरंच होते काय? ते काही असो. सर्व पडझडीत प्रथमच एका पवारांचा तीर सुटला आहे. अर्थात या तीराने कोणी घायाळ झाले नाही, पण तीर सुटला हे महत्त्वाचे. 

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात आयाराम गयारामांचे पीक जोरात आले आहे. गयाराम कसले? फक्त आयारामांचाच जोर आहे. रावसाहेब दानवे हे अनेकदा मुद्द्याचे बोलतात. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रावसाहेबांनी कोपरखळी मारली. आयारामांची लाट पाहून दानवे म्हणाले, ‘‘बाबांनो, इतकेही घुसू नका की आम्हालाच बाहेर पडावे लागेल.’’ दानवे म्हणतात ते खरेच आहे. आयारामांची रांग शिवसेनेतही लागली आहे. पण आमच्याकडे माणसं धुवून घेण्याचे वॉशिंग मशीन नसल्याने माणसं पारखूनच घ्यावी लागतात. काँग्रेस मृतवत होऊन पडली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इतकी भोके पडली आहेत की त्यांची चाळणी झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष संपेल व त्या पक्षात फक्त शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील. पण एका ‘चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. ‘पंत चढले राव आले’ अशी एक व्यवहारी म्हण आहे. त्या धर्तीवर ‘पार्थ पडले रोहित चढले’ असेच म्हणायला लागेल. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे कासवगतीने पुढे जात आहेत व शरद पवारांना सोबत करीत आहेत. बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे. 2014 प्रमाणेच 2019 च्या निवडणुकीतही शरद पवारांवरच हल्ले सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांत

काँग्रेस किंवा पवारांचे

राज्य महाराष्ट्रात नव्हते. राज्य आपले, म्हणजे ‘युती’चे होते. त्यामुळे पाच वर्षांत फडणवीस सरकारने केलेल्या कामांवर आपण सगळ्यांनीच  बोलायला हवे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा सध्या सोलापूर दौर्‍यावर आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. घराणेशाही, भ्रष्टाचार हा त्यांच्या टीकेचा विषय होता. यावर ‘चौथ्या’ पवारांनी उत्तर दिले आहे. गरज पडली की साहेबांचा म्हणजे शरद पवारांचा सल्ला घ्यायचा. बारामतीत येऊन सोयीनुसार कौतुक करायचे आणि निवडणुकांच्या वेळी साहेबांनी काय केले असे विचारायचे? कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असे साहेबांचे राजकारण नाही असेही रोहित पवारांनी ठणकावले आहे. पवारांच्या गोटातून इतक्या दिवसांत प्रथमच जोरदार तीर सुटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास अभूतपूर्व अशी गळती लागली आहे. ज्यांना पवारांनी वर्षानुवर्षे वतनदार्‍या आणि सुभेदार्‍या दिल्या ते सगळेच ‘उड्या’ मारून ‘गयाराम’ झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावरील पवारांची मूठ ढिली पडल्याचे हे लक्षण आहे. पवारांनीही त्यांच्या हयातीत मोडतोड तांब्यापितळेचे राजकारण केले व त्यांनी शिवसेनेतूनही काही मासे जाळ्यात ओढले. आज त्यांच्या गोठय़ातील लोक दावण्या तोडून सैरावैरा पळत आहेत. हे सत्य असले तरी महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली. हे इतके झाल्यावर पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा प्रश्न विचारणारे म्हणजे डबल ढोलकीचे  राजकारण असल्याचा तीर रोहित पवारांनी मारला. पवार यांचा पक्ष आज साफ कोलमडला आहे व नितीन गडकरी यांच्या शब्दांत

उंदीरमामांनी उड्या मारल्या

आहेत. हे सर्व उंदीरमामा भ्रष्टाचारी होते व त्यांनी महाराष्ट्र कुरतडला होता, असा आक्षेप असला तरी हे ‘मामा’ आपापल्या भागातले वतनदार होते. या अनेकांच्या भ्रष्टाचाराचा पाढा मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासह विधानसभेत मांडला व त्यातील काही जणांनी आता सरकार पक्षात प्रवेश करून महाराष्ट्राची नव्याने सेवा करायचे ठरवले आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत लोक राहायला तयार नाहीत व तेथील प्रवाह शिवसेना-भाजपकडे का वळत आहे? त्याचा खुलासा चंद्रकांत पाटील यांनीच केला. तिकडे निवडून येणे शक्य नसल्याने ते फायद्यासाठी पक्ष बदलत आहेत असे चंद्रकांतदादांनी सांगितले. प्रवाह आणि हवा बदलत असते. राजकारणात वार्‍यावरच्या वरातीही इकडे तिकडे जात असतात. पक्ष बनतात आणि कमजोरदेखील होतात. पण कोणताच पक्ष कधीच कायमचा संपत नाही याचे भान राजकारणातील प्रत्येकाने ठेवायला हवे. पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एका फुटीतून उभा राहिला. त्यामुळे फुटलेलेच पुन्हा फुटले. चौथ्या पवारांनी तीर मारताना आता सांगितले की, घरात आमदारकीपासून खासदारकी आलेली नेते मंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. जाडंभरडं पीठ दुसर्‍या पक्षात गेलं असे चिरंजीव रोहित म्हणतात. हे पीठ राष्ट्रवादीचे खरंच होते काय? सगळेच आयत्या पिठावर रेघोट्या मारीत जगले. सगळे पिठाधीश, आता बाहेर पडले. अरे बाबा, आमदार, खासदारकीचे काय घेऊन बसलात? मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग बांधून नवरदेव झालेलेही उड्या मारतात तेथे इतरांचे काय? ते काही असो. सर्व पडझडीत प्रथमच एका पवारांचा तीर सुटला आहे. अर्थात या तीराने कोणी घायाळ झाले नाही, पण तीर सुटला हे महत्त्वाचे.

Post a Comment

Previous Post Next Post