मन विषण्ण झाल्याने राजीनामा देणं योग्य नाही : सुधीर मुनगंटीवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
जनतेची काम करण्यासाठी तुम्ही आमदार झाला आहात. त्यामुळे मन विषण्ण झाल्याने राजीनामा देणं योग्य नाही, असा टोला राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे. शिखर बँकप्रकरणी त्यांच्यावरील कारवाईत राज्य सरकारचा काहीही संबंध नाही, ही कुठल्याही प्रकारे सुडाची कारवाई नाही. यामध्ये केवळ मुंबई हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी पवार कुटुंबावर राजकीय सुडभावनेने कारवाई केली जात असून यामुळे मन विषण्ण झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे. त्याला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी सर्व आरोप खोडून काढले आहेत. बँकेत केवळ साडे अकरा हजार कोटींच्या ठेवी असताना २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगितले जात आहे. हा आम्हाला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचा आरोप अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे. याला ही मुनगंटीवार यांनी उत्तर दिल आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे ही आकडेवारी मांडली गेली आहे. त्यावर हायकोर्टाने हे खंर आहे की नाही, हे तपासण्यासाठी एफआयर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. कोर्टाच्या या आदेशाचे पालन केवळ सरकारने केले आहे. त्यामुळे ही सरकारने स्वतःहून केलेली सुडाची कारवाई नाही. तसेच जर २५ हजार कोटींचा आकडा चुकीचा असेल तर कोर्टासमोर आणि चौकशी संस्थांसमोर त्यांनी याचा खुलासा करावा, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
या प्रकरणांत केवळ पवार हे नाव असल्यानेच ही केस उभी राहिली. जर ते नाव नसतं तर केसही झाली नसती या अजित पवारांच्या आरोपाला उत्तर देताना 'त्यांना जर असं वाटत असेल तर आता हायकोर्टालाच विचारावं लागेल की या प्रकरणात पवारांचं नाव असल्यानेच त्यांनी एफआयआरचे आदेश दिले का?' अशी टिपण्णी त्यांनी केली आहे. विरोधकांवर खटले चालवून निवडणुका जिंकता येत नाहीत. आम्ही निवडणुका आमच्या कर्तुत्वावर आणि कामावर जिंकतो, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी निवडणुकांच्या काळात मुद्दाम सरकारकडून या कारवाया केल्या जात असल्याचे आरोप साफ़ फेटाळून लावले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post