उद्योग खात्याचा कॉर्नेल विद्यापीठासोबत लवकरच सामंजस्य करार


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार नव उद्यमींना (स्टार्ट अप्स) आर्थिक सहाय्य तसेच समुपदेशन करण्यासाठी मुंबई येथे इन्क्युबेशन सेंटर स्थापन केले जाणार असून त्यासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र शासन लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
हे केंद्र मुंबई येथे प्रस्तावित असून दरवर्षी 60 लाभार्थींना प्रशिक्षण व इतर प्रशासकीय सहकार्य केले जाणार आहे. याद्वारे नवउद्यमींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान व प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. तसेच उच्च तंत्रज्ञानाशी निगडीत बाबींसाठी मार्गदर्शन मिळणार आहे.
नव उद्यमींना नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी सर्व माहिती एका ठिकाणी मिळावी यासाठी इन्क्युबेटर्सची स्थापना केली जाणार आहे. याद्वारे आर्थिक, तांत्रिक तसेच प्रशासकीय सहाय्य देऊन प्रोत्साहित केले जाणार आहे. यासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कॉर्नेल विद्यापीठासोबत राज्य सरकारने सामंजस्य करार करण्याचे निश्चित केले आहे. इन्क्युबेटर्ससाठी लागणारा खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून करण्याचे प्रस्तावित आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे कॉर्नेल विद्यापीठ असून त्याची स्थापना 1865 साली झाली आहे. उच्च दर्जाचे व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाची ख्याती आहे. जगातील एकूण विद्यापीठांमध्ये त्याचा 14 वा क्रमांक लागतो.

Post a Comment

Previous Post Next Post