तृप्ती देसाई यांना घेतले ताब्यात


एएमसी मिरर : वेब न्यूज
‘दारूमुक्त महाराष्ट्र’च्या मागणीसाठी दारूच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्याचा मनोदय जाहीर केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना सहकारनगर पोलिसांनी शनिवारी (ता.१४) त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. प्रतिबंधात्मक कारवाईनंतर देसाई यांना सोडून देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी संध्याकाळी पुण्यात येत आहे.
यात्रेच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाने शहरात जय्यत तयारी केली आहे. यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी पोस्टर्स आणि कमानी उभारल्या आहेत. संपूर्ण शहर स्वागतासाठी सजले असताना भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी मात्र ‘दारूमुक्त महाराष्ट्र’च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून स्वागत करण्याचे जाहीर केले होते. तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सहकारनगर पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post