अजब वक्तव्यामुळे रेल्वेमंत्री गोयल झाले ट्रोल


एएमसी मिरर : वेब न्यूज
रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांची आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध कधीच लावला नसता. या अजब वक्तव्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी चक्क न्यूटनची थिअरी आइन्स्टाईनच्या नावाने खपविल्याने सोशल मीडियावरून गोयल ट्रोल होत आहे. मात्र त्यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव सुरु केली असून आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हणत मीडियावर खापर फोडले आहे. अर्थव्यवस्थेचा विचार करताना मोठमोठ्या आकड्यांमध्ये पडण्याची गरज नसते.
आइन्स्टाइन यांनी आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध कधीच लावला नसता, असे गोयल यांनी म्हटले होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटो सेक्टरमधील मंदीला ओला-उबरला जबाबदार धरले होते. त्यावर सर्वच स्तरातून भाजपवर टीका करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर बोर्ड ऑफ ट्रेड मीटिंगमध्ये बोलताना गोयल यांनी हे विधान केले.

नेटकऱ्यांकडून समाचार
न्यूटनचे नाव बदलले काय? नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर गोयल यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. अनेकांनी तर गोयल आणि आइन्स्टाइनचे मीम्स तयार केले आहेत. गणिताने कधीही आइन्स्टाइन यांच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला नाही, असे मोदींच्या रेल्वे मंत्र्याचे म्हणणे आहे. भाजपने न्यूटनचे नाव बदलून आइन्स्टाइन ठेवले आहे काय? असा सवाल एका यूजर्सने केला आहे.
आइन्स्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तर न्यूटनने काय केलं? असा सवाल आणखी एका यूजर्सने विचारला आहे.
गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नव्हे तर आइन्स्टाइनने लावल्याचा दावा करणारा ऑप इंडिया आणि स्वराज्य सारख्या संकेतस्थळावरील लेखाचीच आता प्रतिक्षा उरली आहे. या विधानावरून गोयल यांना ट्रोल करणे हे तुकडे-तुकडे गँगचे षडयंत्र आहे, असा टोला एका यूजर्सने लगावला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य पाहता सर न्यूटन यांनी कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी बोचरी टीका सामाजिक कार्यकर्त्या शेहला रशीद यांनी गोयल यांच्या वक्तव्यावर करताना म्हटले आहे.
सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी यांनीही गोयल यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. ‘अर्थव्यवस्थेच्या गणिताची जाणीव होण्यासाठी सरकारने डोक्यावर सफरचंद पडण्याची वाट पाहू नये. हे सांगण्यासाठी आम्हाला आइन्स्टाइनचीही (न्यूटनची माफी मागून) गरज नाही. भविष्यातील स्वप्नांच्या मागे धावण्यापेक्षा मंत्र्यांनी वास्तवावर लक्ष केंद्रीत केले तर बरे होईल, असा टोला येचुरी यांनी लगावला आहे.
गोयल यांची सारवासारव मी एका खास संदर्भात ते वक्तव्य केले होते. मात्र काही लोकांनी हा संदर्भच हटवून केवळ एक ओळ पकडून त्याचा बाऊ केला, अशी सारवासारव गोयल यांनी केली आहे. आपल्या विधानात आइन्स्टाइन यांच्या नावाचा उल्लेखच केला नव्हता, असा दावाही त्यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post