विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध १०८ पथके नियुक्त : जिल्हाधिकारी द्विवेदी


एएमसी मिरर : वेब न्यूज
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करुन जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात ही प्रक्रिया पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचारयंत्रणेचे सनियंत्रण करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे ३६ व्हीडिओ निरीक्षण पथक आणि खर्च व आचारसंहितेचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्येकी तीन याप्रमाणे ३६ व्हीडिओ व्हिवींग पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय ३६ भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत असतील.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात एकाच दिवशी म्हणजे २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतमोजणी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी होईल.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक-2019चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर श्री. द्विवेदी यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. जिल्हा निवडणूक यंत्रणेने या निवडणुकीसाठी सर्व सज्जता केली असून विधानसभानिहाय निवडणुक निर्णय अधिकारी यांनी विविध पथकांची स्थापनाही केली आहे. या निवडणुकांसाठीची अधिसूचना २७ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी जारी केली जाईल. नामनिर्देशनपत्र भरण्याचा अंतिम दिनांक ४ ऑक्टोबर (शुक्रवार) हा आहे. दिनांक ५ ऑक्टोबर रोजी छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ७ ऑक्टोबर(सोमवार) आहे. दिनांक २१ ऑक्टोबर (सोमवार) रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला (गुरुवार) मतमोजणी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची कार्यवाही संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात होणार आहे तसेच मतमोजणी संबंधित मतदार संघनिहाय आणि निश्चित केलेल्या ठिकाणी होणार आहे. जिल्ह्यात एकूण १२ विधानसभा मतदारसंघ असून त्यात २१६-अकोले हा अनुसूचित जमातीसाठी तर २२०-श्रीरामपूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. उर्वरित २१७-संगमनेर, २१८-शिर्डी (राहता), २१९-कोपरगाव, २२१-नेवासा, २२२-शेवगाव, २२३-राहुरी, २२४-पारनेर, २२५-अहमदनगर शहर, २२६-श्रीगोंदा आणि २२७-कर्जत-जामखेड हे मतदारसंघ अराखीव आहेत.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांमार्फत केल्या जाणार्‍या इलेक्ट्रॅानिक जाहिराती, सोशल मीडियावरील जाहिराती आणि बल्क एसेमेस यांचे प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक राहणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना २८ लाख एवढी खर्च मर्यादा आयोगाने ठरवून दिली असून खर्च संनियंत्रणासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. अवैध मार्गाने होणार्‍या खर्चाला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय खर्च देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे.
नागरिकांना खर्चविषयक तक्रारी नोंदवण्यासाठी जिल्हास्तरावर सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रासाठीचा टोल फ्री क्रमांक १९५० असा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post