विधानसभा निवडणूक : 5200 अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण


एएमसी मिरर : नगर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर – औरंगाबाद महामार्गावरील सिटी लॉन्स येथे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित 5200 अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण तहसील कार्यालय नगर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणाच्यावेळी प्रमुख मार्गदर्शक नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नगर श्रीनिवास अर्जुन होते. यावेळी तहसीलदार नगर उमेश पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी क्रमांक 1, 2 व 3 यांची कार्यप्रणाली याबाबत अवगत करणे तसेच ईव्हीएम मशीनशी संबंधित प्रश्नांचे निराकरण करणे हे मुख्य उद्दिष्ट होते.
सदर प्रशिक्षण हे तीन टप्प्यात आयोजित करण्यात आले होते आणि प्रत्येक टप्प्यात सतराशे कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार श्री. गायकवाड, महसूल नायब तहसीलदार श्रीमती पाटील, कुळकायदा अव्वल कारकून श्री.मुळे तसेच मंडळाधिकारी, तलाठी आणि कोतवाल संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली. संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक कामासाठी लागणार्‍या एकूण कर्मचार्‍याच्या 20 टक्के कर्मचारी हे नगर तहसीलच्या कार्यक्षेत्रातून पुरवले जातात आणि या सर्वांचे एकत्रित प्रशिक्षण घेणे हे जिकरीचे काम महसूल प्रशासनाने सुयोग्य नियोजनाने पार पाडले.

Post a Comment

Previous Post Next Post