अहमदनगर विधानसभा मतदारसंघात १२ भरारी पथके स्थापन


एएमसी मिरर : वेब न्यूज 
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात प्रशासन निवडणूकीसाठी सज्‍ज झाले आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी करण्‍यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विविध १२ पथके स्थापन केली आहेत. निवडणूक काळात या पथकांचा वॉच राहणार आहे.
नगर मतदारसंघात पुरुष १ लाख ४८ हजार ८७९ व स्‍त्री १ लाख ४० हजार २११ तसेच इतर ७४ असे एकूण २ लाख ८९ हजार १६४ मतदार आहेत. दिनांक १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत १८ वर्षे वय पूर्ण असणा-या नवमतदारांना दिनांक ४ ऑक्‍टोंबर २०१९ पर्यत नव्‍याने मतदार नोंदणी करता येणार आहे.  
मतदार संघात एकूण २८९ मतदान केंद्र आहेत. अहमदनगर (शहर) मतदार संघात ३४४ अपंग व ५६९ सैनिक मतदार आहेत. अपंग मतदारांना मतदानासाठी विशेष सहाय्य देण्‍यात येणार असून सैनिक मतदारांसाठी ऑनलाईन पध्‍दतीने टपाली मतपत्रिका पाठविण्‍यात येणार आहे.
आचारसंहितेची अंमलबजावणी करण्‍यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भरारी पथके (एफएसटी) ३, स्थिर निगरानी पथके (एसएसटी) ३, चल चित्रण निगरानी पथक (व्‍हीएसटी) ३, चल चित्रण निरीक्षण पथक (व्‍हीवहीटी) ३ अशी एकूण १२ पथके स्‍थापन केली आहेत. 
मतदारसंघासाठी २३ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. नागरिकांना C- Vigil या मोबाईल ॲपद्वारे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार थेट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍याकडे नोंदविता येईल. त्‍या तक्रारीचे निवारण १०० मिनिटांचे आत करण्‍यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्‍ये स्‍वतंत्र तक्रार निवारण कक्ष  24 तासांसाठी उभारण्‍यात आलेला आहे. निवडणूका निर्भयमुक्‍त व पारदर्शक वातावरणामध्‍ये पार पाडण्‍यासाठी जागृत मतदारांनी आचारसंहिता विषयक तक्रार असल्‍यास ती समक्ष अथवा C- Vigil या मोबाईल ॲपद्वारे करावी, असे आवाहन नगर शहर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जून व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post