मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करा : मुख्य सचिवांचे निर्देश


एएमसी मिरर : नगर 
विधानसभा निवडणूकीत जिल्हा प्रशासनाने स्वीप कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात मतदार जागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी काम करावे, अशा सुचना राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव श्री. मेहता यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या बैठकीचेआयोजन केले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आदींसह विविध नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्य सचिव श्री. मेहता म्हणाले की, येत्या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा. दिव्यांग मतदारांना आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करुन द्या. आचारसंहिता कालावधीतच सण व उत्सव येतअसल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस दलाने दक्ष रहावे. बंदोबस्तासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास अगोदरच कळवावे. मागणी आल्यास तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल, असे सांगून श्री. मेहता म्हणाले, निवडणूक कालावधीत कडेकोट बंदोबस्त ठेवा. जेणेकरुन निवडणूकीसंबंधी कुठलीही तक्रार येता कामा नये. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस दलाने आपल्या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चेकपोस्ट सुरु करावे. अवैध दारु विक्री होणार नाही याची उत्पादन शुल्क विभागाने तर कुठल्याही प्रकारची अवैध वाहतुक होणार नाही, याची परिवहन विभागाने दक्षता घेऊन राष्ट्रीय व राज्य मार्गावर गस्त वाढविण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमांतर्गत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदारजागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात विधानसभा मतदारसंघात सुरु असल्याचे सांगितले. प्रत्येक मतदारसंघात प्लाईंगस्कॉड, व्हीएसटी पथके, शस्त्र जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण, वाहतुक आराखडा आदिची माहिती यावेळी मुख्य सचिवांनी घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सिंधू यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही, यासाठी पोलीस दल सक्षमपणे काम करत असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post