'या' 12 जागांवरून भाजप-शिवसेनेत संघर्ष?


एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असले तरी शिवसेना भाजप युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. भाजपने शिवसेनेला 115 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे परंतू शिवसेना 125 च्या मागणीवर ठाम असल्याची माहिती आहे. त्यामुळे 10 ते 12 जागांवरून भाजप शिवसेनेत संघर्ष सुरू असल्याचे समजते. त्यामुळेच युतीची अधिकृत घोषणा लांबल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत गेल्या 25 वर्षांपासून अभेद्य असलेली शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यानंतर राज्यात भाजपने आपली वाढलेली ताकद दाखवून देत 122 जागांपर्यंत मजल मारली. यंदा मात्र दोन्ही पक्षांनी एकत्रिपणे विधानसभा निवडणुकांचा सामना करत आहेत. मात्र काही जागांवरून युतीचं घोड अडलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल तसंच विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया आणि मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर आणि ठाण्यातील उल्हासनगर या जागांचा समावेश आहे, अशी चर्चा आहे.
राज्यात भाजपची ताकद आता वाढली आहे. भाजपने जो अंतर्गत सर्व्हे केला त्यात स्वबळावर सत्ता मिळू शकते, असे सर्वेक्षण असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे जागावाटप आणि युतीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post