शिवसेनाप्रमुखांना दिलेले वचन पूर्ण करणार; युती होणारच : उद्धव ठाकरे


एएमसी मिरर : वेब न्यूज
एक ना एक दिवस मी शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या पदावर बसवून दाखवेन, असे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिलेलं आहे.  वाट्टेल त्या टोकाला जाऊन ते वचन मी पूर्ण करेन. तसेच येत्या निवडणुकीत युती होणारच आहे, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.
मुंबईतील रंगशारदा येथे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या घडामोडींबाबत रोखठोक मते मांडली. उद्धव ठाकरे म्हणाले की, मला कोणाचं वाईट होताना अजिबात आनंद होत नाही. शुक्रवारी दिवसभर ज्या बातम्या चालत होत्या की, पवारसाहेबांना ईडीची नोटीस आली म्हणतात, नाही आली असं म्हणतात. मग अजित पवारांनी राजीनामा दिला. मला नाही त्यांच्या कौंटुबिक भांडणात रस. मला नाही त्यात आनंद व्यक्त करायचा, असे ते म्हणाले. शिवसेनेने जे कमावलं आहे ते संघर्षातून कमावले असून ते कोणाच्या आशीर्वादाने कमावलेलं नाही, असे ते म्हणाले. जो कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका, असं शिवसेनाप्रमुख नेहेमी म्हणायचे, याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिली. मी अखेरच्या काळामध्ये शिवसेनाप्रमुखांना एक ना एक दिवस मी शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या पदावर बसवून दाखवेन असे वचन दिले होते. ‘मी राजकारण सोडणार नाही, मी शेती करणार नाही मी शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन’ असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.

मुख्यमंत्र्यांशी व्यवस्थित बोलणं सुरू आहे
युतीची एकदोन दिवसांत घोषणा होईल. माझं आणि अमित शहा तसेच मुख्यमंत्र्यांशी व्यवस्थित बोलणं सुरू आहे. जे राजकारण घडतंय-बिघडतंय ते बघून मी, अमित शहा आणि मुख्यमंत्री कुठे जिंकण्याची शक्यता कोणाला कुठे जास्त आहे, हे तपासत असल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची ताकद पाहिजे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसेना ही हवीच असे उद्धव ठाकरे म्हणाले. आपली जागा आहे तिथे भाजपची ताकद मिळाली पाहिजे आणि जिथे भाजपची जागा आहे तिथे माझ्या शिवसेनेची ताकद त्यांच्यामागे उभी करावी लागेल, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मला बंडखोरी चालणार नाही
जागावाटप झाल्यानंतर मला बंडखोरी चालणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. तसेच युती झाली आता समोर कोणीच नाही, असं समजून गाफील राहू नका, असेही ते म्हणाले. जेव्हा समोर कोणीच नसतो तेव्हा धोका अधिक असतो. समोरचा कुठून येईल हे सांगता येत नाही यामुळे तुम्ही गाफील राहू नका, असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आणि इच्छुकांना सांगितले. उमेदवारी निश्चित करण्याचा काळ हा माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतो. जीवाला जीव देणारी माणसं उमेदवारी न मिळाल्याने तुटतात, त्यावेळी माणसं नाही तर अंत:करण तुटत असतं. मग ती जातात आणि स्वत:चा, पक्षाचा, कार्याचा घात करतात आणि मग फिरून परत येतात आणि सांगतात की आमचं चुकलं. आता अशा चुका करू नका, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना केले.

Post a Comment

Previous Post Next Post