आदर्श ग्राम स्पर्धेत 'चिखली' राज्यात सर्वप्रथम


एएमसी मिरर : नगर
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत (व्हीएसटीएफ) घेण्यात आलेल्या आदर्श ग्राम स्पर्धेचा निकाल मूल्यांकन समितीचे अध्यक्ष तथा आदर्श गांव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी जाहीर केला आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील आदिवासी क्षेत्र असलेल्या चिखली या गावाला आदर्श ग्रामचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
द्वितीय पुरस्कार गणेशवाडी (ता.कळंब, जि.यवतमाळ) व शेंदोला खुर्द (ता.तिवसा, जि.अमरावती) या दोन गावांना विभागून देण्यात आला आहे. तर तृतीय पुरस्कार जांभूळखेडा (ता.कुरखेडा, जि.गडचिरोली), खारसाई (ता.म्हसाळा, जि.रायगड), घाटकूळ (पोम्बुर्णा, जि.चंद्रपूर) या तीन गावांना विभागून देण्यात आला असल्याचे पोपटराव पवार यांनी स्पष्ट केले. पोपटराव पवार यांच्यासह मनरेगाचे उपसचिव प्रमोद शिंदे, कृषी विभागाचे सहसंचालक ज्ञानेश्वर बोटे, कृषितंत्रज्ञ गणेश तांबे, व्हीएसटीएफचे व्यवस्थापक प्रफुल रंगारी, अभियान सहयोगी ख्याती मिनिझेस आदींनी या स्पर्धेच्या मूल्यांकन समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. मागील दोन वर्षात गावांमध्ये झालेल्या कामांची दखल या स्पर्धेत घेण्यात आली.
व्हीएसटीएफ अभियान व स्पर्धेबाबत माहिती देतांना पवार म्हणाले की, ‘व्हीएसटीएफ’मार्फत राज्यातील 1 हजार गावांमध्ये ग्राम परिवर्तन व समाज परिवर्तनाचे काम सुरू आहे. शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहचविण्याचे, जनजागृती करण्याचे काम सुरू आहेत. या अंतर्गत ग्राम परिवर्तकांमार्फत जनतेच्या सहभागातून योजनांची अंमलबजावणी व गावांचा विकास होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील दोन वर्षात झालेल्या या कामांच्या आधारावर आदर्श ग्राम स्पर्धा राबविण्यात आली. त्यासाठी राज्यातील नंदुरबार, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, रायगड, पुणे या 12 जिल्ह्यातील 24 गावांची निवड करण्यात आली. स्थानिक पातळीवर तेथील जिल्हाधिकार्‍यांनी प्रमाणात मूल्यांकन केले होते. त्याचाही फायदा आम्हाला झाला, असे त्यांनी सांगितले. राज्यातील हा पहिला प्रयोग होता. येणार्‍या काळात हा कार्यक्रम देशासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास पोपटराव पवार यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या व्हीएसटीएफ अभियानाचे प्रमुख आहेत. अमिताभ बच्चन, रतन टाटा, राजकुमार धूत, कुमार मंगलम बिर्ला, सचिन तेंडूलकर, आमिर खान, डॉ. अभय बंग, व्हीएसटीएफचे सीईओ रामनाथ सुब्रमन्यम आदींचा समावेश असलेली ही राज्यस्तरीय समिती आहे. राज्य सरकारच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविणे, त्या माध्यमातून गावे समृध्द करणे हा ‘व्हीएसटीएफ’चा मूळ उद्देश आहे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय परिवर्तकांची नियुक्ती करुन गावपातळीवर अभियान राबविले जात आहे.
- पोपटराव पवार (अध्यक्ष, आदर्श ग्राम मूल्यांकन समिती)

प्रथम पुरस्कार : 
चिखली (ता.नवापूर, जि.नंदुरबार)
द्वितीय पुरस्कार : 

गणेशवाडी (ता.कळंब, जि.यवतमाळ)
शेंदोला खुर्द (ता.तिवसा, जि.अमरावती)
तृतीय पुरस्कार :  

जांभूळखेडा (ता.कुरखेडा, जि.गडचिरोली)
खारसाई (ता.म्हसाळा, जि.रायगड)
घाटकूळ (पोम्बुर्णा, जि.चंद्रपूर)

Post a Comment

Previous Post Next Post