राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडीसमोर हजर


एएमसी मिरर : वेब न्यूज
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा जवळचा सहकारी दिवंगत इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिरची याच्याशी असलेल्या कथित आर्थिक भागीदारी संदर्भात राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्‍ल पटेल यांची सक्‍तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशी सुरु केली आहे. या चौकशीसाठी आज प्रफुल्‍ल पटेल ईडीच्या कार्यालयात दाखल झाले.

वरळीतील नेहरू प्लॅनेटोरियमजवळ असलेल्या मोक्याच्या ठिकाणचा भूखंड जो इक्बाल मिरचीच्या मालकीचा होता तो प्रफुल्‍ल पटेल यांच्या कुटुंबीयांची मालकी असलेल्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा.लि. च्या नावे हस्तांतरित करण्यात आला. याप्रकरणात दोन्ही कुटुंबांकडून रितसर करार करण्यात आला. त्यानंतर या जागेवर सीजय हाऊस या नावे १५ मजली व्यापारी तसेच निवासी इमारत उभारण्यात आली, असा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. या करारपत्रावर ईडीने आपले सर्व लक्ष केंद्रित केले आहे.


ईडीने या प्रकरणात ब्रिटिश नागरिक असलेला हारुन आलीम युसूफ आणि रणजितसिंग बिंद्रा यांना अटक केली आहे. मुंबईमध्ये असलेल्या मोक्याच्या जमिनी इक्बाल मिरचीला मिळवून देण्यामध्ये या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीजय हाऊसच्या दोन मजल्यांची कागदपत्रे इक्बाल मिरचीची पत्नी हजरा मेमन आणि तिच्या मुलांच्या नावावर असल्याचे ईडीच्या तपासात पुढे आले.

Post a Comment

Previous Post Next Post