उदयनराजेंपेक्षा अबू आझमी श्रीमंत


एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांच्या संपत्तीची चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये सुरु झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे प्रथमच ठाकरे घराण्याची संपत्ती समोर आली आहे. त्यानंतर आता उदयनराजे भोसले व् अबू आझमी यांच्या संपत्तीची चर्चा सुरु झाली आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांनी स्वत: आणि पत्नीकडे एकूण 209 कोटी 8 लाख चल-अचल संपत्ती असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. तर सातारा लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या 157 कोटी 22 लाख, तर पत्नी दमयंती यांच्याकडे 4 कोटी 14 लाखांची संपत्ती आहे. अशारीतीने एकूण 161 कोटी 36 लाख 75 हजार रुपयांची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. उदयनराजेंकडे 25 लाख आणि त्यांच्या पत्नीकडे 1 लाख 95 हजार रोख रक्कम आहे. उदयनराजेनपेक्षा आबू आझमी यांची संपत्ती अधिक असल्याने सोशल मीडियात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

आदित्य ठाकरेंच्या नावे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती
आदित्य ठाकरे कोट्यधीश असल्याचं समोर आलं आहे. आदित्य ठाकरेंच्या नावे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आहे. आदित्य ठाकरेंनी पेशाने व्यावसायिक असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. यामध्ये 10 कोटी 36 लाखांच्या बँक ठेवी आहेत. 20 लाख 39 हजार रुपयांचे बॉन्ड शेअर्स आहेत. साडेसहा लाखांची एक बीएमडब्लू बाईक आहे. 64 लाख 65 हजारांच्या सोन्याचा यामध्ये समावेश आहे. तर 10 लाख 22 हजार अशी एकूण 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आदित्य ठाकरेंच्या नावावर आहे.

भाजपचे मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार
आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपचे मलबार हिलचे उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. मंगलप्रभात लोढा यांनी एकूण 441 कोटींची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. या संपत्तीशिवाय त्यांच्यावर 283 कोटींचं कर्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमधून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे एकूण 22.98 कोटींची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेचे जालन्यातील उमेदवार अर्जुन खोतकर यांच्याकडे 7.67 कोटींची तर मुलगा अभिमन्यूकडे 2.24 लाख रुपयांची संपत्ती आहे.

Post a Comment

Previous Post Next Post