रामजन्मभूमीप्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा स्वीकार करा; संघाकडून आवाहन

 
एएमसी मिरर : वेब न्यूज
अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा जो काही निकाल येईल, तो खुलेपणाने स्वीकारावा अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी त्याची माहिती दिली.
रा. स्व. संघाच्या प्रचारकांची बैठक देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू आहे. बैठकीत अयोध्या प्रकरणावर चर्चा झाली. त्याची माहिती देताना अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी अयोध्येप्रकरणी टिप्पणी केली. ते म्हणाले की, अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आगामी काही दिवसात येण्याची शक्यता आहे. न्यायालयाचा जो काही निकाल येईल, तो खुलेपणाने स्वीकारायला हवा. निकालानंतरही देशभरात सौहार्दाचे वातावरण राखणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे अरुण कुमार यांनी सांगितले.
दीर्घकाळपासून प्रलंबित असलेला आणि देशाच्या राजकीय तसेच सामाजिक अवकाशावर परिणाम करण्याची क्षमता असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. सरन्यायधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सलग ४० दिवस प्रकरणाची सुनावणी केली. यादरम्यान दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडली, हजारो पानांची कागदपत्रे पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर करण्यात आली होती. येत्या काही दिवसातच खटल्याचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघाची ही भूमिका महत्वाची ठरते.

Post a Comment

Previous Post Next Post