नगर : सहा जनावरांच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल


एएमसी मिरर : नगर
महापालिका प्रशासनाने मोकाट सोडलेल्या जनावरांच्या मालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. जनावरे रस्त्यावर सोडून रहदारीला अडथळा आणल्याप्रकरणी सहा जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार चौक ते सर्जेपुरा चौक दरम्यान रस्त्यावर मोकाट जनावरांचा मोठा वावर असतो. जवळच असलेल्या परिसरातील नागरिकांच्या मालकीची ही जनावरे मोकळी सोडण्यात येतात. त्यामुळे रहदारी अडथळा निर्माण होतो. रस्त्यांवर अस्वच्छताही होते. जनावरे नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, अशी फिर्याद प्रशांत रामदीन यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार दत्तू छगनराव गोंधळे, रवी दगडू गवळी, अशोक सूर्यभान निस्ताने, संताराम छगनराव घुले, माधू भागोजी गोडळकर (सर्व रा.गवळीवाडा, सिव्हील हॉस्पिटलसमोर) व इक्बाल आयुब खान (रा.मिसगर कॉलनी, लालटाकी) यांच्या विरोधात भादवि कलम 289, 290 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मनपाकडून प्रथमच अशाप्रकारे कठोर भूमिका घेऊन कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे गवळीवाडा परिसरातही खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post