नगर : उपनगरात शनिवारी तर शहरात रविवारी पाणी नाही


एएमसी मिरर : नगर 
शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाच्या दुरुस्ती कामांसाठी महापालिकेमार्फत शनिवारी (दि.12) सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. याकाळात मुळानगर, विळद येथून होणारा पाणी उपसा बंद राहणार असल्याने पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवारी उपनगर भागात व रविवारी (दि.13) शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.
पाणी उपसा बंद राहणार असल्याने शनिवारी बोल्हेगांव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर व स्टेशनरोड, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर भागास सकाळी 11 नंतर पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तर रविवारी रोटेशननुसार पाणी वाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी व गुलमोहररोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसिपल हाडको या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या भागात रविवारऐवजी सोमवारी (दि.14) पाणी सोडण्यात येणार आहे.
सोमवारी पाणीपुरवठा होऊ घातलेल्या सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, ख्रिस्तगल्ली, कापडबाजार, माळीवाडा, बालिकाश्रमरोड परिसर या भागात सोमवार ऐवजी मंगळवारी (दि.15) पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करुन उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे, अशा भागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post