सूडाच्या राजकारणाला नगरकरांनी तिलांजली दिली : आ.संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर
मागील काळात विकासाच्या मुद्द्यावर कुणीही चर्चा करत नव्हते. या निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली. विरोधकांनी दहशत, संरक्षणाच्या मुद्यावर निवडणूक लढविली. मात्र, नगरकरांनी विकासाला साथ दिली. आज जनतेनेच मला आमदार करून जनतेच्या दरबारात क्लिनचीट दिली आहे. सूडाच्या राजकारणाला नगरकरांनी तिलांजली दिली आहे, अशा शब्दांत नवनिर्वाचित आमदार संग्राम जगताप यांनी विरोधी शिवसेनेवर हल्ला चढविला आहे.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. आमदार जगताप म्हणाले की, मागील पाच वर्षात मी विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचा प्रयत्न केला. येत्या काळातही विकासाचाच अजेंडा शहरात राबविणार आहे. शहरात मागील काळात चुकीचे राजकारण झाले. अनेकांना गोवण्याचे काम झाले. आम्हालाही यातून जावे लागले. मात्र, दहशत, संरक्षण या मुद्द्यांवरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न यंदा जनतेनेच हाणून पाडला आहे. माझ्यावर झालेल्या आरोपांना जनतेने मला विजयी करुन तिलांजली दिली आहे, असे ते म्हणाले.
नगर शहरात मध्यवर्ती भागातील अतिक्रमण, रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न महत्वाचे आहेत. ते प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार आहे. छोट्या विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन दिली, तर हा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यासाठी चर्चा करुन मार्ग काढला जाईल. उपनगर परिसरातील प्रलंबित प्रश्नांबाबतही लक्ष घालून ते कायमस्वरुपी मार्गी लागतील अशा उपाययोजना करणार आहे. राजकारण बाजूला ठेवून जे विकासासाठी बरोबर येण्यास तयार असतील त्या सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. ‘व्हिजन 2024’ प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अनेकांनी सहकार्याची तयारी दर्शविली आहे. त्या सर्व घटकांना बरोबर घेऊन शहराच्या विकासाला दिशा देण्याचे काम येत्या काळात केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहरात महापालिकेशी निगडीत प्रश्नांबाबत दिवाळीनंतर आयुक्तांसमवेत बैठक घेणार आहे. तसेच शहरातून जाणार्‍या महामार्गांची दुरवस्था झाली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. पाऊस थांबताच शहरातून जाणार्‍या महामार्गांचे डांबरीकरण सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार अरुण जगताप म्हणाले की, संग्राम जगताप यांनी मागील पाच वर्षात विकासकामे जनतेमध्ये विश्वास निर्माण केला. या विश्वासावरच संग्राम जगताप यांना जनतेने निवडून दिले आहे. येत्या दोन वर्षात शहरात मोठा बदल दिसेल. नागरिकांनीही आता बदलासाठी साथ द्यायला हवी. जनतेची साथ असेल, तर शहर विकासाचे स्वप्न साकारता येईल, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेस नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, कुमार वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post