मनपा अधिकार्‍यांच्या पगारातून 1 कोटी वसूल का करु नयेत?


एएमसी मिरर : नगर
बुरुडगाव कचरा डेपोमध्ये प्रस्तावित असलेला बायोमेंथानेशन प्रकल्प मुदतीत पूर्ण न झाल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने महापालिका प्रशासनाला चांगलेच खडसावले आहे. मनपाने ठेवलेली एक कोटी रुपयांची परफॉर्मन्स गॅरंटी जप्त करुन त्या रकमेची वसुली आयुक्तांसह सर्व संबंधित अधिकार्‍यांच्या पगारातून वसूल का करु नये? अशी विचारणा करत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश लवादाने गुरुवारी (दि.17) झालेल्या सुनावणीवेळी दिले आहेत.


कत्तलखान्यातील अनिमल वेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारणीचे आदेश यापूर्वीच हरित लवादाने दिलेले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. परिणामी, मार्च महिन्यात लवादाने महापालिकेला प्रकल्प उभारण्यासाठी सहा महिन्यांची (ऑगस्टपर्यंत) मुदत दिली होती. मनपाकडून कार्यवाही होत नसल्याने एक कोटी रुपयांची परफॉर्मन्स गॅरंटी जमा करण्याचे आदेशही लवादाने दिले होते. त्यानुसार मनपाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे 1 कोटींची गॅरंटीही जमा केलेली आहे. ऑक्टोबरपर्यंत प्रकल्प पूर्ण न केल्यास गॅरंटी जप्त करण्याचा इशाराही लवादाने दिला होता.
महापालिका प्रशासनाने बुरुडगाव डेपोत 5 टन क्षमतेचे दोन प्रकल्प प्रस्तावित केलेले आहेत. त्याची निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेशही देण्यात आलेला आहे. मात्र, अद्यापही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी मनपाच्या वतीने अ‍ॅड. अजय गडेवार यांनी माहिती दिली. प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे लवादासमोर मांडण्यात आले. मात्र, वारंवार मुदत देऊनही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसल्याने लवादाने मनपा प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेने जमा केलेले 1 कोटीची परफॉर्मन्स गॅरंटी जप्त करुन ही रक्कम आयुक्तांसह प्रकल्पाशी संबंधित अधिकार्‍यांच्या पगारातून वसूल का करु नये? असा सवाल करत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. या संदर्भातील लेखी आदेश व नोटीसा येत्या दोन दिवसांत अधिकृतपणे उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post