आमचं ठरलयं.. कळमकर राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत?

सोशल मीडियात व्हायरल झालेले अभिषेक कळमकर यांचे पोस्टर 

एएमसी मिरर : नगर
माजी महापौर अभिषेक कळमकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शरद पवार यांच्या मेळाव्यानंतर घडलेल्या प्रकारानंतर ते अद्यापही पक्षात अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. अशातच कळमकर हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. आमचं ठरलयं.. अशा पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत.
शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून कळमकर कुटुंबिय ओळखले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षात ते अस्वस्थ आहे. कळमकर व आमदार संग्राम जगताप समर्थकांमधील वादही विकोपाला गेले आहेत. शरद पवार यांच्या नगरमधील मेळाव्यानंतर कळमकर यांना जगताप समर्थकांकडून धक्काबुकीचा तसेच बूट फेकून मारण्याचा प्रकार घडला होता. वरीष्ठ नेत्यांनी यावर पडदा घालण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, या प्रकारानंतर अभिषेक कळमकर अद्यापही नाराजच आहेत. ते शहरातून विधानसभा लढविण्यासही इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने ते पक्षाच्या प्रचारापासून व निवडणुकीपासून दूरच आहेत. आता त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेलाही उधाण आले आहे.
कळमकर हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. सोशल मिडियातूनही याबाबत संकेत देणार्‍या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. मात्र, कळमकर कुटुंबियांचे विशेषतः दादाभाऊ कळमकर व शरद पवार यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे दादाभाऊ कळमकर राष्ट्रवादी सोडणार नाहीत. त्यांच्याकडून अभिषेक कळमकर यांची समजूत घालण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते ‘राष्ट्रवादी’त थांबण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे.
या संदर्भात अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क साधला असता, येत्या काही दिवसांत राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितलेआहे.

Post a Comment

Previous Post Next Post