राहुल गांधींच्या 'मेडिटेशन'वर भाजपचं शरसंधान


एएमसी मिरर : वेब न्यूज
काँग्रेस नेते राहुल गांधी मेडिटेशन (ध्यानधारणा)साठी परदेशात गेल्याने त्यांच्यावर भाजपने टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी परदेशात नक्की कशासाठी गेले? त्यांच्या संपूर्ण दौऱ्याची माहिती काँग्रेसने जाहीर करावी, असं आव्हान भाजपनं काँग्रेसला दिलं आहे.
महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांपूर्वी राहुल गांधी कंबोडियाला गेले होते. मात्र नंतर निवडणूक प्रचारासाठी ते परत भारतात आले होते. त्यानंतर त्यांनी हरयाणात दोन आणि महाराष्ट्रात पाच जाहीर सभा घेतल्या. याकाळात काही ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकांचे निकालही लागले. त्यावर राहुल यांनी अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही. या निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली झाली. मात्र त्यांना विजय मिळविता आला नाही.
निवडणुकांनंतर राहुल गांधी पुन्हा एकदा परदेशात गेले आहेत. मात्र ते कोणत्या देशात गेले याची माहिती देण्यात आलेली नाही. राहुल गांधी वेळोवेळी मेडिटेशनसाठी परदेशात जात असतात. त्यामुळेच ते सध्या परदेशात गेले आहेत. देशातील आर्थिक स्थिती ढासळत चालल्याने १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत देशात ३५ पत्रकार परिषद घेण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांच्या सल्ल्यानुसारच हा कार्यक्रम आखला गेला आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं.
त्यावर भाजपचे नेते अमित मालवीय यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भारत मेडिटेशनचं सर्वात मोठं केंद्र आहे. ध्यानधारणा ही भारताची प्राचीन परंपरा आहे. तरीही राहुल गांधी मेडिटेशनसाठी परदेशात गेले. राहुल यांना केंद्राने उच्च सुरक्षा दिली आहे. त्यामुळे काँग्रेस राहुल यांचा मेडिटेशनचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर का करत नाही? असा सवाल मालवीय यांनी केला आहे.

भाजपने यापूर्वीही राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्नचिन्हे उपस्थित केलेली आहेत. त्यावर काँग्रेसने वेळोवेळी उत्तरंही दिली आहेत. भारतात लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्याची सार्वजनिक चर्चा करणं योग्य नाही, असं काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रणव झा यांनी म्हटलंय. तर प्रत्येकाचं स्वातंत्र्य आणि गोपनीयता लक्षात घेतली पाहिजे. त्यात ढवळाढवळ करता कामा नये, असा टोला काँग्रेस नेते अभिषेक मनू संघवी यांनी म्हटलं.Post a Comment

Previous Post Next Post