दिवाळी विशेष : धनत्रयोदशी आणि कुबेर पूजनआश्‍विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेम राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश पाडला जातो. गाणी गाऊन व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. त्यामुळे यम आपल्या यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात, अशी आख्यायिका प्रचलित आहे. म्हणूनच, या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो, असा समज आहे.
धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्रमंथन संदर्भातील. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून, त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो, असे म्हटले आहे. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे म्हणजेच देवांच्या डॉक्टरचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमरत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर कसलीही व्याधी होण्याचा संभव नाही, अशी काही जणांची समजूत आहे. कडुनिंबाचे असे महत्त्व आहे म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर, विष्णू-लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.
जैनधर्मीय या दिवसाला ‘धन्य तेरस’ वा ‘ध्यान तेरस’ म्हणतात. भगवान महावीर या दिवशी तिसर्‍या व चौथ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसांच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.
देवांचा खजिनदार किंवा सावकार म्हणजे कुबेर. कुबेर हा एक विद्वान आणि श्रीमंत अशा सोमदत्त या ब्राह्मणाच्या घरात जन्मलेला मुलगा. त्याचे नाव गुणनिधी असे होते; पण वाईट संगत लागली आणि तो चोरी करू लागला. आईने पाठीस घातल्याने वडिलांना कळाले नाही. जेव्हा कळले तेव्हा रागावून त्याला त्यांनी घरातून हाकलून दिले. त्यानंतर तर आपल्या गुणनिधी या नावाच्या विरुद्ध त्याचे वर्तन सुरू झाले. उपासमार होऊ लागली. भुकेने व्याकुळ झाला असताना त्याला एक शिवमंदिर दिसले. तिथे प्रसाद दिसत होता. त्याने चोरी करायचे ठरवले. रात्रीची वेळ होती. पुजारी जागा असल्याने चोरी करता येत नव्हती. रात्रभर उपवास घडला. पुजार्‍याचा डोळा लागताच त्याने देवालयातील दिव्यावर फडके धरले व प्रसाद चोरला. तेवढ्यात पुजार्‍याला जाग आली व चोर चोर म्हणून तो ओरडला. लोक धावत आले व त्याला बदडून काढले. भुकेल्या स्थितीतच मार खाल्ल्याने तो बेशुद्ध पडला. तो मरणार म्हणून यमदूत न्यायला आले; पण शिवरात्रीला उपवास घडला व फडके लावल्याने  दिवा विझला नाही, हे पुण्य मिळाल्याने शिवगण आले व त्याला शिवलोकात घेऊन गेले. तिथे त्याने शंकराची प्रार्थना केली. शंकराने वर देऊन त्याला प्रचंड श्रीमंत करून देवांचा खजिनदार बनवले. विष्णूनेही एकदा कुबेराकडून कर्ज घेतले होते.
आश्‍विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. या दिवशी रामाचा पूर्वज रघुराजाने विश्‍वजित यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान करून नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्साने  कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या म्हणून रघुराजाने कुबेरावर आक्रमण करण्याची तयारी केली. युद्ध टाळण्यासाठी आपटा आणि शमी या वृक्षांवर कुबेराने सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला.एवढा कुबेर श्रीमंत होता. कुबेर रावणाचा सावत्र भाऊ होता. जसा वाल्याचा वाल्मीकी झाला, तसा तो चोराचा सावकार झाला, असे ही कथा सांगते. वाईटातूनही चांगल्याची निर्मिती होऊ शकते, हे याचे सार आहे. कुबेराप्रमाणे गडगंजसंपत्ती मिळावी, या शुद्ध भावनेने कुबेर पूजन केले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post