गांधींचे विचार आचरणात आणा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी


एएमसी मिरर : वेब न्यूज 
गांधींवर आजपर्यंत खूप साहित्य लिहिल्या गेले अनेक थोर लेखकांनी त्यांच्या शब्दातून महात्माजींचे जीवन उलगडले परंतु तरीही आपण गांधींना विसरलो असे परखड मत व्यक्त करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा गांधींना खरे अभिवादन करायचे असल्यास त्यांना आचरणात आणण्याचा मोलाचा सल्ला दिला.
सायन स्थित षण्मुखानंद हॉल येथे षण्मुखानंद फाइन आर्ट आणि संगीत सभेच्या वतीने महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नृत्य आणि संगीताचे शानदार कार्यक्रम प्रस्तूत झाले. कार्यक्रमाला पंडित कल्याणसुंदरम्, गांधीजींचे पणतू डॉ. आनंद गोकानी, डॉ. वी शंकर आणि लक्ष्मी रामास्वामी यांची उपस्थिती होती.
राज्यपाल म्हणाले, गांधीजींच्या जयंतीनिमित्त असे कार्यक्रम आयोजित करण्यासोबतच आपण त्यांच्या प्रत्यक्ष विचारांवर चालायला शिकलो पाहिजे. यासाठी आपण स्वच्छतेचा आग्रह धरायला हवा. सोबतच आपण भारतीय संस्कृतीची जपवणूक करायला हवी. पाश्चात्यांचे अनुसरण करणे चुकीचे आहे. महात्माजींनी परदेशात शिक्षण घेऊनही भारतीय संस्कृती त्यागली नाही. त्यांचे अनुकरन करून आपण आध्यात्म आणि भारतीय संस्कृतीकडे वळायला हवे असे विचार राज्यपालांनी व्यक्त केले.

गांधीजींचे पणतू डॉ. आनंद गोकानी म्हणाले, गांधीजी प्रत्येक माणसात अस्तित्वात आहे. पण त्याला ओळखण्याची गरज आहे. सत्य आणि धैर्य या दोन गोष्टी जर प्रत्येकाने अंगिकारल्या तर गांधीजींचे स्वप्न साकार होईल. गांधी काळाची गरज आहे, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना जोपासा असे ते म्हणाले. यावेळी डॉ. वी शंकर यांनी देखील विचार व्यकत केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post