‘नरसिंह राव’ सरकारच्या धोरणांना ‘जवळ’ करा; अर्थमंत्र्यांच्या पतीचा सल्ला

एएमसी मिरर : वेब न्यूज  
गेल्या काही महिन्यांपासून देश आर्थिक मंदीचा सामना करीत आहे. आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. असे असूनही, अर्थव्यवस्थेत काही विशेष सुधारणा दिसत नसल्याचे चित्र आहे. आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने १९९१ सालचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या धोरणांमधून शिकले पाहिजे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ पेरकला प्रभाकर यांनी सध्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल लिहिलेल्या लेखातून नरेंद्र मोदी सरकारला दिला आहे.
परकला प्रभाकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये लेख लिहून मोदी सरकारला माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी अवलंबिलेल्या आर्थिक मॉडेलला 'आलिंगन' देऊन जवळ करण्याचा सल्ला दिला आहे. १९९१ मध्ये ढासळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी उदारीकरण स्विकारावे लागले होते. याच उदारीकरणाचा उल्लेख परकला यांनी करून मोदी सरकारने यातून सकारात्मक शिकावे, असा सल्ला दिला आहे.
प्रभाकर आपल्या लेखात लिहितात की, भाजप पक्ष आपल्या स्थापनेपासूनच कोणत्याही आर्थिक संरचनेचा प्रस्ताव आणू शकलेला नाही. त्यांच्याकडून फक्त नेहरूंच्या आर्थिक रचनेची टीका केली जाते. भाजपने नेहमीच 'नाही... हे नव्हे' असेच धोरण स्वीकारले आहे. त्यांचे स्वतःचे धोरण काय आहे त्यांनी कधीही काहीच सांगितले नाही. भाजपाच्या सध्याचे नेतृत्वाला बहुदा याची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकांच्या काळात अर्थव्यवस्थेबाबतचे धोरण जनतेसमोर सादर होणार नाही याची काळजी घेतली. आर्थिक धोरणाऐवजी त्यांनी धुर्तपणाने राजकीय, राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय सुरक्षा आदींची व्यासपीठ म्हणून निवड केली असून या मुद्यांद्वारे ते जनतेसमोर जात आहेत.
प्रभाकर म्हणतात की, नरसिंह राव सरकारच्या धोरणांना भाजप नाकारले किंवा आव्हान दिले नाही. १९९१ च्या नरसिंहराव सरकारचे धोरण स्वीकारले तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post