व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हेरगिरी गंभीर, धनंजय मुंडेंचं राज्यपालांना पत्र


एएमसी मिरर : वेब न्यूज
व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देशातील पत्रकार, मानवी हक्क चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात सुरु असलेली हेरगिरी निषेधार्ह, संतापजनक आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ही हेरगिरी बंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र देखील दिले आहे.
या पत्रात मुंडे यांनी म्हटलं आहे की, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देशातील जनतेच्या, पत्रकारांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून त्यातील फोटो, व्हिडीओ, ऑडीओ संवादासारखी वैयक्तिक, खाजगी स्वरुपाची सगळीच माहिती काढून घेतली जात असल्याचे उघड झाले आहे. देशातील लोकसभा निवडणुकीच्या काळात 20 एप्रिल ते 10 मे या कालावधीत एका विशिष्ट संस्थेने मोठ्या प्रमाणात माहितीची हेरगिरी केली आहे.
या हेरगिरीमागे शासकीय व्यवस्थेतील संस्थांचा सहभाग असण्याची शक्यताही मुंडे यांनी व्यक्त केली. देशातील शासकीय यंत्रणांनी यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये अशा पद्धतीने नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात घुसखोरी, हेरगिरी केल्याचे वारंवार समोर आले आहे. हे निषेधार्ह, संतापजनक आहे, असेही मुंडे यांनी म्हटलं आहे.
देशातील नागरिकांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडणे, त्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात डोकावणे, त्यांच्या व्यक्तिगत, खाजगी, संवेदनशील माहितीची चोरी करणे हा गंभीर अपराध आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात डोकावण्याचा प्रकार गंभीर असून यातून प्रचंड जनक्षोभ उसळण्याची भीती नाकारता येत नाही, अशी भीतीही मुंडे यांनी राज्यपाल महोदयांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post