काश्मीर आणि लडाख उद्यापासून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश


एएमसी मिरर : वेब न्यूज
जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायदा २०१९ नुसार उद्यापासून (गुरुवार) जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येणार आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभेसह तर लडाख विधानसभेशिवाय केंद्रशासित प्रदेश असणार आहे.
जम्मू-काश्मीर राज्याला विशेषाधिकार देणारे कलम ३७० आणि कलम ३५ अ केंद्र सरकारने यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संपुष्टात आणले. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करीत जम्मू-काश्मीर आणि लडाख असा दोन केंद्रशासित प्रदेशांचीही निर्मिती करण्यात आली.
जम्मू-काश्मीर हा दिल्लीप्रमाणे विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश आहे, तर लडाख हा चंदीगडप्रमाणे विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू-काश्मीरसह संपूर्ण दृष्टीने हे दोन्ही निर्णय अतिशय महत्वाचे ठरले असून त्याचा जागतिक राजकारणावरही परिणाम झाला आहे.
संसदेने संमत केलेल्या कायद्यानुसार दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश हे ३१ ऑक्टोबर रोजी अस्तित्वात येतील, असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. देशाचे पहिले गृहमंत्री आणि संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करण्याचे महत्वाचे कार्य कुशलतेने पार पाडणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य यासाठी साधण्यात आले आहे.
याविषयी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू -काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल या सर्वप्रथम जम्मू – काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. त्यानंतर त्या लडाख येथे रवाना होतील आणि तेथे लडाखचे नायब राज्यपाल राधाकृष्ण माथुर यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.

Post a Comment

Previous Post Next Post