'जिओ' यूजर्सना कंपनीचा दणका; फुकट कॉल होणार बंद


एएमसी मिरर : वेब न्यूज
जिओ कंपनीने त्यांच्या यूजर्सना मोठा दणका दिला आहे. पुढच्या आठवड्यापासून जिओ वगळता इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी चक्क पैसे मोजावे लागणार आहेत. मोफत कॉलिंग केवळ जिओ नेटवर्कवरच उपलब्ध राहणार आहे.
२०१७ मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)द्वारे प्रतिस्पर्धी नेटवर्क कंपन्यांच्या क्रमांकावर कॉल झाल्यास संबंधित कंपनीला सेवा पुरवठादार कंपनीनं ६ पैसे प्रति मिनिट शुल्क देण्याचे निर्देश दिले होते. जानेवारी २०२० पर्यंतच हे शुल्क लागू होते. त्यामुळे 'जिओ'नेही आतापर्यंत आपल्या ग्राहकांवर हे शुल्क लागू केले नाही. त्यापोटी, 'जिओ'नं आतापर्यंत भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आदी कंपन्यांना १३५०० कोटी रूपये दिले. मात्र, 'ट्राय'द्वारे हे शुल्क कायम ठेवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असल्याने  'जिओ'नं आता ही जबाबदारी ग्राहकांवर टाकली आहे. या शुल्काला इंटरकनेक्ट युसेज चार्ज अथवा IUC म्हणून ओळखलं जातं. 'जिओ'च्या या निर्णयामुळे बाजारात 'जिओ' आल्यापासून पहिल्यांदाच 'जिओ' ग्राहकांना यापुढे केल्या जाणाऱ्या कॉलिंगचे पैसे भरावे लागणार आहेत. पुढील बुधवारपासून हे बदल लागू होतील.
'जिओ'चे भारतात ३५ कोटी ग्राहक आहेत. 'जिओ'द्वारे लागू करण्यात येणारे हे शुल्क 'जिओ' ते 'जिओ' कॉल केल्यास, 'जिओ' ते स्थिरभाष दूरध्वनीवर (लॅण्डलाईन) कॉल केल्यास किंवा 'जिओ'च्या इंटरनेटसेवेवरील व्हॉट्सअप किंवा तत्सम ध्वनीसंदेश (व्हॉईस कॉल) संपर्क सेवा पुरवणाऱ्या सुविधांसाठी लागू नसेल. याशिवाय, 'जिओ'च्या वापरकर्त्यांना भरावे लागणाऱ्या या शुल्काची परतफेड कंपनीकडून इंटरनेट डेटा सेवेच्या शुल्कातून भरून दिले जाईल. म्हणजेच, तेवढ्या पैशांचा अधिकचा डेटा वापरकर्त्यांना उपलब्ध होईल. दरम्यान 'जिओ'वर येणारे (इनकमिंग) कॉल मात्र पूर्वीप्रमाणेच मोफत असतील.

काय आहे इंटरकनेक्ट युसेज चार्ज (IUC)?
इंटरकनेक्ट युसेज चार्ज अथवा IUC म्हणजे एका मोबाईल टेलिकॉम ऑपरेटरद्वारे दुसऱ्या ऑपरेटर कंपनीला दिले जाणारे शुल्क आहे. जेव्हा एका कंपनीचे ग्राहक त्याच कंपनीच्या नेटवर्कला सोडून अन्य कंपनीच्या नेटवर्कवरील ग्राहकाला फोन करतात, तेव्हा कॉल करणाऱ्या ग्राहकाच्या कंपनीला दुसऱ्या कंपनीला हे शुल्क द्यावे लागते. दोन भिन्न नेटवर्क कंपन्यांमधील या कॉलला मोबाईल ऑफ-नेट कॉल म्हणून ओळखलं जातं. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)द्वारे या IUCचं शुल्क ठरवलं जातं, जे सध्या ६ पैसे प्रति मिनिट आहे.         

Post a Comment

Previous Post Next Post