'ती' क्‍लीप खोटी; सत्यता तपासण्याची धनंजय मुंडे यांची मागणी


एएमसी मिरर : वेब न्यूज
काल (शनिवार) सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांच्यावर टीका केलेली क्‍लीप व्हायरल झाली. यावरून पंकजाताईंच्या समर्थंकांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोलिस स्‍टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यावरून धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लीप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, अशी मागणी स्वतः धनंजय मुंडे यांनी केली आहे.


अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा. आपली निवडणूक विकास कार्यावर आहे. ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका, ही कळकळीची विनंती आहे, असे त्यांनी म्‍हटले. मी विरोधासाठी राजकारण करत नाही तर परळीच्या विकासासाठी राजकारण करत आहोत. या निवडणुकीत आपण फक्त परळीच्या विकासासाठी लढतोय. परळीतील नागरिकांचाही या लढ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काही जणांना निकाल लागण्याआधीच पराभवाची भीती वाटू लागली आहे. म्हणून ही विकासाची निवडणूक पुन्हा भावनिकतेच्या मुद्यावर आणण्याचा काहींचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण हा प्रयत्न व्यर्थ ठरणार हे निश्चित, असे मुंडे म्हणाले.
मी जे कधी बोललोच नाही त्याच्या खोट्यानाट्या क्लीप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. मी आजपर्यंत कोणाचेही वाईट केले नाही, कोणाचे वाईट चिंतिले नाही. माझ्या विरोधकांबाबत मी कधी अपशब्द देखील वापरला नाही. काहींनी तर मला राक्षस म्हणून हिणवलं पण मी माझे तत्व सोडले नाही. मी कालही तत्वाचे राजकारण करत होतो, आजही तत्वाचे राजकारण करत आहे. मी माझ्या १५०० बहिणींचे कन्यादान केले आहे. मी कधीही कोणत्याच महिलेबाबत चुकीच्या शब्दांचा वापर करणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेजवर केलेल्या खुलाशात म्हटले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post