अधिकार्‍यांविरोधात हक्कभंग दाखल करणार : आ. संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर 
निधी उपलब्ध असतानाही दिल्लीगेट येथील नीलक्रांती चौकातील रस्त्याचे काम सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, नागरिकांना प्रवास करणेही मुश्किल झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणाचा फटका सर्वसामान्य नगरकरांना बसत असल्याने आमदार संग्राम जगताप यांनी याची दखल घेत अधिकार्‍यांविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
शासनाच्या विशेष निधीतून शहरात अनेक रस्त्यांचे कामे प्रस्तावित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. दिल्लीगेट येथील नीलक्रांती चौकातील रस्त्याच्या कामाचाही यात समावेश आहे. मात्र, मुर्दाड अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे निधी उपलब्ध असूनही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. या रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले आहे. गटारीचे काम सुरू केले होते. तेही अर्धवट अवस्थेत सोडण्यात आलेले आहे.
आमदार जगताप यांनी निवडणुकीपूर्वी परिस्थितीची पाहणी करुन अधिकार्‍यांना सूचना दिल्या होत्या. त्यांनीही काम सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, अद्यापही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे आमदार जगताप यांनी संबंधित अधिकार्‍यांविरोधात येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post