‘लाखोंचे धनी अन् म्हणे मी फकीर’


एएमसी मिरर : नगर
‘मी फकीर आहे, माझे बँकेत खाते ही नाही’, असे म्हणत फकीर असल्याचे सोंग आणणार्‍या निलेश लंके यांचे पितळ उघडे पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असलेल्या लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्र व संपत्तीच्या विवरण पत्रातून ते फकीर नव्हे तर ‘लखपती’ असल्याचे उघड झाले आहे.
निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अपक्ष म्हणून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरण देण्यात आले आहे. यातून त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. लंके यांच्याकडे 58 लाख 56 हजार 521 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर 15 लाख 35 हजार 153 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच त्यांच्यावर 32 लाख 28 हजार 989 रुपयांचे कर्ज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लंके यांच्याकडे 13 हजार 977 रुपयांच्या ठेवी व शेअर्स, 17 लाख 3 हजार 688 रुपयांची बस, 26 लाख 75 हजार 936 रूपयांची कार, 13 लाख 22 हजार 260 रुपयांची बस, 7 हजार 100 रुपयांची दुचाकी, 76 हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या आहेत. लंके यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांच्याकडे 40 हजार रोख, 4 हजार 735 रुपयांच्या ठेवी, 1 लाख 14 हजारांचे सोन्याचे दागिने आहेत.
पारनेरचे विद्यमान आमदार विजयराव औटी यांच्या विरोधात दंड थोपटतांना लंके यांनी ‘मी फकीर आहे, माझे बँकेत खातेही नाही’ असे वक्तव्य यापूर्वी केले होते. मात्र, उमेदवारी अर्जासोबत त्यांनी दिलेल्या विवरण पत्रातून ते लाखोंच्या मालमत्तेचे धनी असल्याचे उघड झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post