'शरद पवारांना अध्यक्षपद दिल्यास ते राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील'


एएमसी मिरर : वेब न्यूज 
शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्षपद दिल्यास ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात आठवले यांना एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी शरद पवारांना आपण फार पूर्वी याबद्दल सल्ला दिला होता, असे ते म्हणाले. विलीनीकरण करावे की नाही हे त्यांनी ठरवावं. मी त्यांच्याबरोबर होतो तेव्हा मी पवारांना सल्ला दिला होती की वेगळी काँग्रेस चालवण्यापेक्षा आपण सोनिया गांधी यांच्याशी भेटून चर्चा करावी. सोनिया गांधी अध्यक्ष आहेत. आपण कार्यकारी अध्यक्ष व्हावे. काही काळानंतर तुम्हाला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. तुमची इच्छा प्रधानमंत्री होण्याची आहे. अशी परिस्थिती आल्यास कदाचित तुमचा नंबर लागू शकेल. फक्त राष्ट्रवादी पक्ष चालवून शरद पवार कधीतरी पंतप्रधान होतील, अशा स्वप्नांमध्ये राहून चालणार नाही, हे मी त्यांना पूर्वी सांगितले होते,असेही आठवले म्हणाले.
आता सुशीलकुमार शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करुन एकच पक्ष तयार करावा. मात्र, असे झाल्यास शरद पवार यांना कोणते पद देणार? असा प्रश्न निर्माण होईल. आताच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये राहुल गांधी अध्यक्ष व्हायला तयार नाहीत. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत. त्यामुळे शरद पवार यांना अध्यक्षपद देत असतील तर राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव मान्य करु शकतो. शरद पवार यांना अध्यक्षपद दिल्यानंतर ते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रस्तावाला मान्यता देऊ शकतील असं वाटतं, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post