शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार : उध्दव ठाकरे


एएमसी मिरर : वेब न्यूज 
राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर आमच्या आस्थेचा मुद्दा आहे. विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा, या मागणीवर शिवसेना आजही ठाम असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही कर्जमुक्ती द्यायची आहे. युतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
दसरा मेळाव्यात ते बोलत होते. उध्दव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात सगळीकडे दहा रुपयांमध्ये चांगल्या जेवणाची थाळी देणार आहे. युतीचं सरकार असताना 1 रुपयात झुणका भाकर कशी मिळत होती, याचे उदाहरणही त्यांनी दिले. वीजेच्या पहिल्या 300 युनिटचा विजेचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार अशीही घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली. गावोगावी 1 रुपयात चाचणी करणारी आरोग्य केंद्र उभारणार आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बस सेवाही शिवसेना उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवारांच्या राजीनामा नाट्याचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू आहेत की आता राजकारणाचा स्तर खालावला आहे. त्यामुळे मी शेती करणार. शेती करणार मात्र धरणात पाणी नसेल, तर काय करणार? अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला मगरीच्या डोळ्यातले अश्रू आठवले, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post