आरेतील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाची तूर्तास स्थगिती


एएमसी मिरर : वेब न्यूज
आरेतील उर्वरित वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. आरे वृक्षतोड प्रकरणी कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिलं होतं. याची दखल घेत, त्याचं याचिकेत रुपांतर झाला आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयात आज (7 ऑक्टोबर) विशेष पीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत कोणताही निर्णय होईपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 21 ऑक्टोबरला या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. याच दिवशी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.
न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीवर नाराजी व्यक्त केली. आरेतील झाडं तोडायला नको होती, असे सांगतानाच आरेतील वृक्षतोड तात्काळ थांबवा, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर आतापासून एकही वृक्षाची तोड केली जाणार नाही, अशी माहिती राज्याची बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली.
सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर आता पूर्वनियोजित 1,400 झाडांची तोड थांबली आहे. प्रशासनाने आधीच तिथली 1,200 झाडं कापली आहेत. आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी एकूण 2646 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे.
दरम्यान, आरेतील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांना अटक करण्यात आली होती. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनाही तात्काळ मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहे. पर्यावरण मंत्रालयालाही यात सहभागी करून घेण्यास न्यायालयाने सांगितले. तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत परिस्थिती जैसे ठेवण्याचे आदेश देत न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post