शेतकरी आत्महत्येबाबत दोन शब्द तरी बोला, राहुल गांधींचा मोदी, फडणवीसांवर हल्लाबोल


एएमसी मिरर : वेब न्यूज
मोदीजी, फडणवीसजी जरा बेरोजगारीबद्दल दोन शब्द तरी बोला. उद्योग बंद होत आहेत, त्याबद्दल बोला. शेतकरी आत्महत्येबद्दल दोन शब्द तरी बोला. ते याबाबत बोलणार नाहीत. त्यांनी निदान ‘पीएमसी’ बँकेबाबत तरी बोलावे. त्या बँकेचे संचालक कोण होते? कोणाचे नातेवाईक होते? किती जणांचे नुकसान झाले? किती जणांना पैसा दिला गेला? यावर त्यांनी बोलावं असे आव्हान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपाला दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांनी राज्यात सभा घेत सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्ला चढविला.
देशात बेरोजगारीची समस्या वाढली आहे का? कर्जमाफी झाली आहे का? आरोग्याचे प्रश्न मिटले आहेत का? शेतकरी आत्महत्या थांबल्या का? शिक्षणाच्या समस्या मिटल्या का? असे अनेक सवाल त्यांनी सभेला उपस्थित जनतेला केले.
इस्रोची सुरुवात आम्ही (काँग्रेस) केली. मात्र आम्ही कधी त्यांच्या कामावर बोललो नाही. मात्र विद्यमान सरकार कायमच चांद्रयान मोहिमेवर बोलत आहे. सरकारने देशासमोरील प्रश्नांवर काय उपाययोजना केल्या हे त्यांना सांगता येत नाही, हे त्यांचं अपयश आहे. ते झाकण्यासाठीच पळवाटा काढत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
इंग्रज देशाला लुटत होते, तसं भाजप गरीबांचे पैसे चोरून श्रीमंतांना देते आहे. भारतातील गरिबांचा पैसा हिसकावून तो देशातील सर्वाधिक श्रीमंताना द्यायचा व देशातील जनतेचे लक्ष सातत्याने भरकटवत राहायचे, ही त्यांची पद्धत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला. 

Post a Comment

Previous Post Next Post