मंत्री राम शिंदे समर्थक भाजप तालुकाध्यक्षांना मारहाण


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावरुन कर्जत तालुक्यात भाजपचे तालुकाध्यक्ष व पालकमंत्री राम शिंदे यांचे निकटवर्तीय अशोक खेडकर यांना मारहाण करण्यात आली. धांडेवाडी येथे ही घटना घडली. महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी धांडेवाडी येथे बैठक झाली. बैठकीनंतर पिंटू धांडे यांचे घराजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ऋषिकेश धांडे, विलास धांडे व इतर तिघांनी ‘तू येथे प्रचाराला का आलास, येथून निघून जा’, असे म्हणत धक्काबुक्की करुन मारहाण केल्याचे खेडकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उपविभागीय पोलीस अधीकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. अशोक खेडकर यांना झालेल्या मारहाणीचा भाजप, शिवसेना, रिपाई, रासप, शिवसंग्राम या सर्व मित्रपक्षांनी निषेध केला आहे. आरोपींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ऋषिकेश धांडे यांनी फिर्याद देऊन अशोक खेडकर व त्यांच्या सहकार्‍यांनी भाजपचा प्रचार करण्यासाठी दबाव टाकून दमदाटी, धक्काबुक्की केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार अशोक खेडकर, प्रकाश शिंदे, बजरंग कदम, धिरज पडवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत-जामखेड तालुक्यात पालकमंत्री राम शिंदे व शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात ‘हायव्होलटेज’ लढत होत आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतांना हाणामारीच्या घटना सुरू झाल्याने तणाव निर्माण झाला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post