निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; १६ हजार कर्मचारी नियुक्त


एएमसी मिरर : नगर 
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या जाहीर प्रचाराची सांगता झाली. उद्या २१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील बारा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
निवडणूकीची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासन, निवडणूक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन यांनी केली आहे. प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर यंत्रणा असे जिल्ह्यातील १२ मतदारसंघात ३ हजार ७२२ मतदान केंद्रांवर १६ हजार ३६७ अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात १६ सखी मतदारसंघ राहणार आहेत. तर १२ दिव्यांग संचलित मतदारसंघ राहणार आहेत. वेब कास्टिंगची सुविधा ४१६ मतदान केंद्रांवर असणार आहे. या निवडणुकीसाठी ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.


या विधानसभा निवडणुकीतही सर्व मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. महिला, नवमतदार, दिव्यांग अशा सर्वांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. संकल्पपत्र, वोट आर्मी, कॅम्पस ॲम्बॅसिडर, सिग्नल विधानसभेचा, मे आय हेल्प यु- मतदार सहायता कक्ष, मेरे देश की सेल्फी- असे सेल्फी पॉईंट, लोकजागर मतदानाचा, पीडब्लूडी वोटर फेस्टीवल, मी विधानसभा बोलतेय हा टॉक शो, विद्यार्थ्यांशी थेट संवाद असे विविध उपक्रम राबविले. सर्व मतदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला. तो यशस्वी होईल आणि जिल्ह्यातील मतदार मोठ्या संख्येने त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील, असा विश्वास द्विवेदी यांनी व्यक्त केला.
मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात मतदार सहायता कक्ष उभारला असून तेथे अद्यावत मतदार यादी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेवल ऑफीसरकडे मतदार याद्या दिल्या आहेत. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने वोटर स्लीप मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदारांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान आहे, हे शोधणे सुलभ होणार आहे. मतदान करताना छायाचित्र मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. ज्या मतदाराकडे छायाचित्र मतदार ओळखपत्र नसेल त्यांची इतर 11 पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
मतदानाच्या दिवशीही दिव्यांग मतदारांना मतदार केंद्रापर्यंत येण्यासाठी सुलभ व्हावे, यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगासाठी सहायक म्हणून आपण २ हजार ५५७ स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर रॅम्पस्, व्हीलचेअर्सची व्यवस्था, मॅग्निफाईंग ग्लास आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आवश्यक पुरेसा बंदोबस्तही जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे. याशिवाय, आर्म ॲक्ट अंतर्गत शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रे जमा केली आहेत. समाजकंटकांवर कारवाई करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये जिल्हा महसूल हद्दीच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मतदानाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये किंवा मतदान केंद्रापासुन 100 मीटर अंतराच्या आतील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये मते मिळविण्यासाठी प्रचार करता येणार नाही. 
मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी वगळता इतरांना सेल्युलर फोन, कॉडलेस फोन नेण्यास परवानगी नाही, याची प्रत्येक मतदारांनी नोंद घ्यावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिल्या.


Post a Comment

Previous Post Next Post