भाजपच्या पराभूत उमेदवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या विजयी आमदारांसह पराभूत झालेल्या चारही उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (दि.२६) रात्री मुंबईत भेट घेतली. तसेच राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेतली.
आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी यावेळी उपस्थित होते. आमदार बबनराव पाचपुते हे मात्र यावेळी अनुपस्थित होते, असे समजते.
नगर जिल्ह्यातील भाजपच्या पाच उमेदवारांचा पराभव झाला आहे. पराभूत उमेदवारांच्या पराभवाला विखे फॅक्टर कारणीभूत असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. जिल्ह्यातील पाडापाडीच्या राजकारणाला हे सर्व बळी ठरल्याचे बोलले जात आहे. 12 विरुद्ध 0 अशी घोषणा विखे पाटलांनी केली होती. ही घोषणाही फोल ठरली आहे. त्यामुळे विखेंना मंत्रीपद नको, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासमोर भाजपचे आव्हान कायम ठेवायचे असेल, तर राम शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, अशी शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने व राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने या भेटीत निकालाबाबत मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली? यंदा विखेंच्या मंत्रिपदाला कात्री लागणार का? मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार? राम शिंदे यांचे पुनर्वसन मुख्यमंत्री करणार का? बबनराव पाचपुतेंना संधी मिळणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष बेरड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post