उड्डाणपुलासाठी शिवसेनेने त्रास दिला : दिलीप गांधी


एएमसी मिरर : नगर 
शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारापासून अलिप्त असलेल्या भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी येत्या दोन-तीन दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे उड्डाणपूला रखडल्याचे सांगत श्रेयवादासाठी शिवसेनेच त्रास दिला असा आरोपही गांधी यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मागील पाच वर्षातील कारकिर्दीचा आढावा मांडण्यासाठी गुरुवारी (दि.10) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गांधी म्हणाले की, शहरात प्रस्तावित उड्डाणपूल 2015 मध्येच मंजूर झालेला आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे व श्रेयवादामुळे उड्डाणपुलाचे काम अद्याप रखडले आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. त्यांनी श्रेयवादातून तांत्रिक मंजुर्‍या मिळण्यास अडचणी आणल्या. महापालिकेचा आवश्यक असलेला ठरावही लवकर करुन दिला नाही. परिणामी मंजूर उड्डाणपूल रखडत गेला. मुख्यमंत्र्यांनी मात्र भूसंपादनासाठी तात्काळ 52 कोटी मंजूर केले. त्यातील 17 कोटी 24 लाख रुपयांचा पहिला हप्ताही महापालिकेकडे वर्ग केला आहे. बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी 100 कोटींचा निधी जमा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेना उमेदवाराच्या प्रचारापासून दूर असल्याकडे गांधी यांचे लक्ष वेधण्यात आल्यानंतर याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने जिथे-जिथे जबाबदारी दिली आहे, तिथे काम करत आहे. उध्दव ठाकरे यांच्या सभेवेळी मी श्रीगोंद्यात पक्षाच्या बैठकीत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केलेे. दरम्यान, मागील पाच वर्षात युती सरकारच्या काळात रेल्वेशी संबंधित अनेक कामे मार्गी लागली. शहरात पाणी व भुयारी गटार योजना मंजूर होऊन काम सुरू झाले. अनेक कामे, प्रकल्पांना मंजुरी मिळून आज त्यांची कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post