राजकीय पाडापाडी : जिल्ह्यातील कुरघोड्यांची परंपरा कायम


एएमसी मिरर : नगर
काना, मात्रा, वेलांटी, उकार नसलेला अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण नावाप्रमाणे सरळ नाही, हे या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले. एकेकाळी कम्युनिष्टांचा गड समजला जायचा. आज सहकाराची पंढरी म्हणून हा जिल्हा ओळखला जातो आणि याच सहकाराला जोडून आलेलं राजकारण देखील राज्यभरात कायम चर्चेत असते. कम्युनिस्टांनंतर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली. विखे, थोरात, काळे, कोल्हे, राजळे, गडाख, तनपुरे, घुले, पाचपुते या साखर सम्राटांचा जिल्ह्यात दबदबा. यातील बहुतेक घराणी विखे किंवा थोरात या दोन नेत्यांशी जोडली गेली. या दोन नेत्यांभोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरायला सुरूवात झाली. नात्याचे राजकारण, पक्षांतर्गत परस्पर कुरघोड्या आणि निवडणुकीतील ‘पाडापाडी’ ही जिल्ह्यातील राजकारणाची परंपरा या विधानसभेच्या निवडणुकीतही पाहायला मिळाली.
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात भाजपाची लाट दिसून आली. त्याचेच वारे राज्यातही वाहिले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक बड्या प्रस्थापितांनी भाजप-शिवसेनेची वाट धरली. यात जिल्ह्यातील राजळे, कोल्हे, पाचपुते भाजपच्या गोटात दाखल झाले. कोल्हे, राजळेंना विधानसभेवर संधीही मिळाली. त्यानंतरच्या काळात जिल्ह्यातील राजकारण सातत्याने ढवळून निघाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी विखे पाटलांनी काँग्रेसची साथ सोडत कमळ हाती घेतले. काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना सर्व नेत्यांची मोट बांधत डॉ.सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिणेतून मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आणि जिल्ह्यातील आपले वर्चस्व दाखवून दिले. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीतील गणितं बदलणार, अशी चर्चाही सुरू झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपाने सत्तेत सामावून घेत गृहनिर्माण मंत्रीपद दिले. विद्यमान खासदार असतांनाही त्यांचे तिकीट कापून सुजय विखेंना उमेदवारी दिली. राम शिंदे यांना मंत्रिमंडळात सामावून घेत मुख्यमंत्र्यांनी दक्षिणेत भाजपाला ताकद देण्याचे काम केले. त्यानंतर उत्तर जिल्ह्यात विखेंना मंत्रीपद दिले आणि विधानसभा निवडणुकीत जिल्हा भाजपमय करुन काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड नेस्तनाभूत करण्याची जबाबदारी विखे पाटलांवर सोपविली. जिल्ह्यात संगमनेर वगळता इतर अकरा मतदारसंघात ‘महायुती’ने तुल्यबळ आणि सक्षम उमेदवार रिंगणात उतरवले. विखे पाटलांनीही जिल्ह्यात ‘12-0’चा नारा दिला. ‘महायुती’च्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे विखे पाटलांची ‘ताकद’ असल्याचे खासदार सुजय विखे यांनी ठासून सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या नगर दौर्‍यात चारही सभांना त्यांनी आवर्जून हजेरी लावली. संपूर्ण दिवस त्यांनी उध्दव ठाकरेंबरोबर घालवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमधूनही विखे यांनी वारंवार ‘12-0’चा नारा दिला. जिल्ह्यात ‘महायुती’ला चांगले वातावरण असल्याचे चित्रही यातून निर्माण झाले होते.
प्रत्यक्षात गुरुवारी झालेल्या मतमोजणीनंतर जिल्ह्यात अनेक धक्कादायक निकाल लागले. शिवसेना जिल्ह्यात भुईसपाट झाली. शिवसेनेने जिल्ह्यात लढविलेल्या चार जागांपैकी दोन जागांवर विद्यमान उमेदवार उभे केले होते. त्यात विधानसभेचे उपसभापती विजय औटी व भाऊसाहेब कांबळे यांचाही दारुण पराभव झाला. भारतीय जनता पक्षाने लढविलेल्या आठ जागांपैकी तीन जागांवर विजय मिळाला. प्रस्थापितांचे बुरूज ढासळले. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विक्रमी मतांनी जियी झाले असले, तरी भाजपने उमेदवारी दिलेल्या सात विद्यमान आमदारांपैकी पाच आमदारांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. पालकमंत्री राम शिंदे, शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड हे भाजपचे पाच आमदार पराभूत झाले. जिल्ह्यातील सर्व बारा जागा जिंकण्याची त्यांची घोषणा फोल ठरली.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीला मिळाल्या. विधानसभेतही महायुतीचा हा झंझावात कायम राहील या भीतीने राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले या दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून रिंगणातून माघार घेतली. या दोन्ही नेत्यांच्या मतदारसंघात कमळ फुलले असले, तरी श्रीगोंद्यात घनश्याम शेलार व शेवगाव मतदारसंघात प्रताप ढाकणे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मते विचार करायला भाग पाडणारी आहेत. ‘12-0’ची घोषणा करणार्‍या विखेंचा करिष्मा या निवडणुकीत कुठेही दिसून आला नाही. 40 वर्षे एकहाती वर्चस्व असलेल्या पिचड यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीची साथ सोडणे त्यांना चांगलेच महागात पडले. कोपरगावमधून विखे पाटलांचे मेव्हुणे राजेश परजणे यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या आमदार कोल्हेंचा पराभवाला सामोरे जावे लागले. राहुरी मतदारसंघातून लोकसभेवेळी विखेंना मोठे मताधिक्य होते. असे असतांनाही या मतदारसंघातून शिवाजी कर्डिले पराभूत झाले. या मतदारसंघात विखेंचे प्राबल्य पूर्वीपासूनच आहे. कारखाना ताब्यात घेतल्यापासून त्यांनी राहुरीवर त्यांची पकड घट्ट केली होती. असे असतांनाही कर्डिलेंचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
श्रीरामपूर मतदारसंघातील निवडणुकीत विखेंची भूमिका कायम निर्णायक राहते. त्यामुळे महायुतीत सामील झालेल्या कांबळे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला जात होता. प्रत्यक्षात त्यांचाही पराभव झाला. विखेंची निर्णायक भूमिका या मतदारसंघातून कुठेच दिसली नाही. नेवासे मतदारसंघात तर स्वतः विखे यांचे समर्थक असलेले मुरकुटे भाजपचे उमेदवार होते. मात्र, त्यांच्या प्रचारात व मतदारसंघात विखे सक्रिय असल्याचे अखेरपर्यंत दिसून आले नाही. याउलट विखेंची यंत्रणा विरोधात करत होती, अशा चर्चा आहेत.
नगर शहर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. सुजय विखे यांना राष्ट्रवादी काँग्रसेचे संग्राम जगताप यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत नगर शहरातून 53 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. स्थानिक भाजप विखेंच्या प्रचारात फारशी सक्रिय नसतांना शिवसेनेने विखेंसाठी प्रचाराची संपूर्ण धुरा खांद्यावर घेतली होती. विखे यांनीही निकालानंतर अनिल राठोड यांच्यावर स्तुतिसुमने उधळत विधानसभेतील त्यांच्या विजयाची जबाबदारी उचलली होती. तशी घोषणाही त्यांनी केली होती. प्रत्यक्षात निवडणुकीत विखेंची यंत्रणा नगरपासून दूरच राहिली. स्वतः सुजय विखेंनी एक प्रचारफेरी वगळता या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. विखे समर्थक, भाजप नगरसेवक हे सर्व ‘राष्ट्रवादी’च्या प्रचारात उघपणे सक्रिय होते. त्यामुळे येथील शिवसेनेच्या पराभवाचे खापरही आता विखेंवर फुटण्यास सुरूवात झाली आहे.
कर्जत-जामखेडमधून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पालकमंत्री राम शिंदेंसमोर आव्हान उभे केले होते. लोकसभा निवडणुकीपासून सुजय विखे यांनी पवार कुटुंबियांविरोधात लढा उभारलेला आहे. त्यामुळे पवारांच्या पराभवासाठी विखे या मतदारसंघात राम शिंदेंना मदतीसाठी संपूर्ण यंत्रणा त्यांच्या पाठिशी उभे करतील, असे बोलले जात होते. मात्र, रोहित पवारांनी राम शिंदेंचा पराभव केला.
‘महायुती’ तडगे उमेदवार निवडणुकीत पराजित झाल्यानंतर आता जिल्ह्याच्या राजकारणाचे वैशिष्ट्य असलेल्या ‘पाडापाडी’च्या राजकारणाची चर्चा रंगात आली आहे. यात विखे हेच केंद्रस्थानी आहेत. अनेक मतदारसंघातून विखे यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यास कार्यकर्त्यांनी सुरूवात केली आहे. कोणत्या मतदारसंघात विखेंची यंत्रणा सक्रिय होती, कुणासाठी सक्रिय होती, त्याचे काय परिणाम झाले, यावरुन आता राजकीय वर्तुळात खलबतं सुरू झाली आहेत. यातूनच येत्या काळात भाजपांतर्गत कलह निर्माण होण्याचीही चिन्हे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post