नगर जिल्ह्यात ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’चेच वर्चस्व; महायुतीला मोठा धक्का


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात ‘12-0’चा दावा ठोकणार्‍या भारतीय जनता पार्टी व शिवसेना नेत्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जोरदार झटका दिला आहे. पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांच्यासह भाजप, सेनेच्या विद्यमान आमदारांना, प्रस्थापितांना पराभव पत्करावा लागला आहे. पडझड होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारत सहा जागांवर विजय मिळविला आहे. तर काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडून रिंगणात उतरलेले व राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेले उमेदवार शंकरराव गडाख यांनीही दणदणीत विजय मिळविला आहे. भारतीय जनता पार्टीला केवळ तीन जागा मिळाल्या असून, या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा सुपडा साफ झाला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपाचे 5 आमदार विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे 3, काँग्रेसचे 3 व शिवसेनेचा एक आमदार होता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे वैभव पिचड यांनी भाजपात तर काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत उडी घेतली. त्यातील पिचड व कांबळे यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. अकोलेत राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेले किरण लहामटे यांनी पिचड यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. तर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या लहू कानडे यांच्या बाजूने मतदारांनी कौल देत विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांना घरचा रस्ता दाखविला आहे. भाजपात दाखल झालेल्या विखे पाटील यांनी मात्र जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळविला आहे.
श्रीगोंद्यातील आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. या मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते विजयी झाले आहेत. नगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा विजय मिळविला आहे. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचा त्यांनी सलग दुसर्‍यांदा पराभव करत नगर शहरातील आपले वर्चस्व सिध्द केले आहे. पारनेर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांनाही धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांनी त्यांचा पराभव केला. कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला आहे. तर नेवासे मतदारसंघातून क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार शंकरराव गडाख यांनी विद्यमान आमदार भाऊसाहेब मुरकुटे यांना धूळ चारली आहे.
संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. मात्र, राहुरी मतदारसंघात भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या मतदारसंघाने पुन्हा एकदा तनपुरे कुटुंबियाला साथ देत प्राजक्त तनपुरेंना विधानसभेत पाठविले आहे. शेवगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे या विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणे यांचा त्यांना पराभव केला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ‘हायव्होलटेज’ लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार रोहित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला आहे. शरद पवार यांचे नातू असलेल्या रोहित पवार यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे या मतदारसंघाकडे लक्ष लागले होते. रोहित पवार यांच्या बलाढ्य यंत्रणेची चर्चाही राज्यात रंगली होती. राम शिंदे यांनीही निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र, रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला.
दरम्यान, जिल्ह्यात पालकमंत्री शिंदे, शिवाजी कर्डिले, विजय औटी, भाऊसाहेब कांबळे, वैभव पिचड या विद्यमान व प्रस्थापित उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस 7 (1 पुरस्कृतसह), काँग्रेस 2 व भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला मात्र जिल्ह्यात एकही जागा मिळविता आली नाही.

जिल्ह्यातील विजयी व पराभूत उमेदवार :  
 
नगर शहर : संग्राम जगताप (विजयी, राष्ट्रवादी, 81217), अनिल राठोड (शिवसेना, 70078) मताधिक्य 11139
कर्जत- जामखेड : रोहित पवार (राष्ट्रवादी, विजयी, 1,35,824), राम शिंदे (भाजप, 92,477), मताधिक्य 43357
अकोले : डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी, विजयी, 1,13,414), वैभव पिचड (भाजप, 55,725), मताधिक्य 57689
कोपरगाव : आशुतोष काळे (राष्ट्रवादी, विजयी, 87566), स्नेहलता कोल्हे (भाजप, 86744), मताधिक्य 822
पारनेर : नीलेश लंके (राष्ट्रवादी, विजयी, 1,39,963), विजय औटी (शिवसेना, 80,125), मताधिक्य 59,838
राहुरी : प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी, विजयी, 1, 09,234 ), शिवाजी कर्डिले (भाजप, 85,908), मताधिक्य 23,326
नेवासा : शंकरराव गडाख (राष्ट्रवादी पुरस्कृत, विजयी 1,16,943), बाळासाहेब मुरकुटे (भाजप, 86,280), मताधिक्य 30,663
संगमनेर : बाळासाहेब थोरात (काँग्रेस, विजयी, 1,25,380), साहेबराव नवले (शिवसेना, 63,128), मताधिक्य 62,252
श्रीरामपूर : लहू कानडे (काँग्रेस, विजयी, 93,906), भाऊसाहेब कांबळे (शिवसेना, 74,912), मताधिक्य 18,994
शिर्डी : राधाकृष्ण विखे (भाजप, विजयी, 1,32,316), सुरेश थोरात (काँग्रेस, 45,292), मताधिक्य 87,024.
श्रीगोंदा : बबनराव पाचपुते (विजयी, भाजप, 1,03,258), घनश्याम शेलार (राष्ट्रवादी, 98,508), मताधिक्य 4,750
शेवगाव : मोनिका राजळे (भाजप, विजयी, 1,12,509), प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी, 98,215), मताधिक्य 14,294

Post a Comment

Previous Post Next Post