नगर : गांधी जयंतीदिनी स्वीप समितीच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी उपक्रम


एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघात महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप समिती आणि संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती, मतदानाचे महत्व अधोरेखीत करणे यासाठी चुनाव पाठशाला, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संकल्पपत्र भरुन घेणे, प्रभातफेरी अशा माध्यमातून बाराही विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम सुरु आहेत. उद्या एकाच दिवशी विविध ठिकाणी असे उपक्रम गावागावांमध्ये राबविले जाणार आहेत. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. द्विवेदी यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि स्वीप समिती सदस्यांना यासंदर्भात सूचना केली असून व्यापक स्तरावर जनजागृती मोहिम राबविण्यास सांगितले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 2 ऑक्टोबर रोजी संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावी मतदार जागृतीचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. या अंतर्गत प्रत्येक गावी सकाळी मतदार जागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात येईल, त्यानंतर प्रत्येक ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे वाचन करून मतदारांना त्यांचे मतदार यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक याबद्दल माहिती दिली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी सांगितले.
मतदान करताना आवश्यक असलेले मतदार फोटो ओळखपत्र, तसेच ते नसल्यास पर्यायी 11 ओळखपत्र याद्वारे ओळख पटवून मतदान करता येईल. याबाबत प्रत्येक ग्रामसभेमध्ये माहिती दिली जाणार आहे. निकोप आणि सुदृढ लोकशाही करिता सर्व मतदारांनी नैतिक मतदान करावे, असे आवाहन प्रत्येक ग्रामसभेतून केले जाणार आहे. त्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यासमवेत प्रत्येक गावी चुनाव पाठशाळा घेऊन मतदारांचे प्रबोधन केले जाईल. मतदार जागृती कार्यक्रमा अंतर्गतच प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी संकल्पपत्र वाटप करण्यात येत असून भरलेले संकल्पपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच प्रत्येक शाळांमार्फत संकलित केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post