आ.संग्राम जगताप यांनी साधला महाविद्यालयीन तरुणांशी संवाद


एएमसी मिरर : नगर
स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी दुसर्‍याला बदनाम करुन शहरात खोट्या अफवा पसरवायच्या आणि या खोट्या अफवांच्या बळावरच निवडणूक लढवायची, हे दिवस आता गेले आहेत. शहरातील जनता सुज्ञ झाली आहे. आता सर्व निवडणुका तरुणाई हातात घेत आहे. त्यामुळे विरोधी उमेदवाराने आपली जुनी स्टाईल वापरुन कितीही कांगावा केला तरी, जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असा टोला आ.संग्राम जगताप यांनी अनिल राठोड यांना लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 4 मधील समतानगर परिसरात चौकसभा घेतल्यानंतर त्यांनी सारडा कॉलेजमध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींशी संवाद साधला. ते म्हणाले की, नगर शहरातील यापुर्वीच्या निवडणुका पाहिल्या तर प्रत्येकवेळी निवडणूक जवळ आली की खोट्या अफवा पसरविल्या जायच्या. त्या अफवांवर भावनिक आवाहन करत विकासाच्या मुद्याला सोयीस्कररित्या बगल दिली जायची. त्यामुळे 25 वर्षे नगर शहर विकासाबाबत मागे राहिले. मात्र हा विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी आपण गेल्या 5 वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कुठे विरोधी उमेदवारसुद्धा आता विकासावर बोलू लागले आहेत. हे आपले सर्वात मोठे राजकीय यश असल्याचे आ.जगताप म्हणाले.
माळीवाडा येथील बैठकीत भाजपाचे अज्जू शेख यांनी विकासाच्या मुद्यावर आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा दिला. तसेच त्यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे जाहिर केले.

Post a Comment

Previous Post Next Post