'त्यांनी फक्त माथी भडकावली, आम्ही तरुणांना रोजगार दिला'


एएमसी मिरर : नगर 
त्यांनी २५ वर्ष नगर शहरात जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण केले. दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले. याउलट आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला, अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. आता तुम्ही ठरवा शहराला विकासाकडे न्यायचे की, पुन्हा पहिले दिवस आणायचे, अशी साद त्यांनी मतदारांना घातली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी मुकुंदनगर परिसरात तसेच सर्जेपुरा भागात प्रचार फेरी काढली. तर प्रभाग सहामध्ये आयोजित मेळाव्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुकुंदनगरच्या प्रचार फेरीत नगरसेवक समद खान, बाबा खान, फैय्याज शेख, फारूकभाई शेख, रफिक मुन्शी, सलीम भिंगारवाला आदी उपस्थित होते. प्रभाग ६ मध्ये आयोजित संवाद मेळाव्यास माजी नगरसेवक दगडू पवार, नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे, डॉ.सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण, योगेश गलांडे, आकाश दंडवते, अविनाश घुले, प्रा. माणिकराव विधाते, डॉ. अविनाश मोरे, संजय सत्रे आदी उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहराच्या विकासाबरोबरच तरुण वर्गाला चांगली दिशा देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण विकासाचे व्हिजन घेऊन नागरिकांसमोर जात आहोत. शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत सर्व नागरिकांनी कुठल्याही अपप्रचाराला, भुलथापांना बळी न पडता विकासाला साथ द्यावी व शहराचा कायापालट करण्यासाठी आपणास पुन्हा एकदा विधानसभेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post