नव्या पिढीच्या भविष्यासाठी एकत्र येऊन टिमवर्क करु : आ.संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर
शहरातील सकल ब्राह्मण समाजाने आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्यास आल्याचे मला समाधान वाटते. शहरातील ब्राह्मण समाजाने काही दिवसांपूर्वी मला मतदान करण्याचा जो  ऐतिहासिक निर्णय घेतला, त्याबद्दल सर्व समाजाचे आभार मानण्यासाठी मी येथे आलो आहे, मला सर्वांची साथ हवी आहे, सर्वांना बरोबर घेऊन एकत्र येवून येणार्या आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी चांगले टिमवर्क उभे करु, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने दिवाळीनिमित्त आयोजित मेळाव्यात आ.जगताप यांनी हजेरी लावून ब्राह्मण समाजाने दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार व्यक्त केले. आ.जगताप म्हणाले की, नगरमधील ब्राह्मण समाजातील बहुतांश युवक-युवती उच्च शिक्षित असतात. मात्र नगरमध्ये त्यांना नोकरीची संधी उपलब्ध नसल्याने शहरातील युवक-युवतींचे बाहेर इतर शहरात स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्वांना शहरातच थांबविता यावे, यासाठी आता आयटी पार्क सुरु करुन नोकर्‍याही दिल्या आहेत. येणार्‍या पिढीसाठी हे काम केले आहे. आता ‘व्हिजन 2024’ घेऊन मी ही निवडणूक लढवत आहे. शहरातील सर्व ब्राह्मण समाजाने मला साथ द्यावी, असे आवाहन जगताप यांनी केले.
दिवाळी निमित्त शहरातील सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने कोहिनूर मंगल कार्यालयात स्नेहमेळावा व ब्राह्मण समाजातील उद्योजकांच्या उत्पादने व सेवांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्यास उत्फुर्त मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 35 विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर व्यासपीठावर सत्कार समारंभ चालू असतांनाच आ.संग्राम जगताप व नगरसेविका शितल जगताप यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानणण्यासाठी मी स्वत:हून येथे आलो असल्याचे आ.संग्राम जगताप यांनी यावेळी सांगितले. महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही या स्नेहमेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री प्रिया मराठे म्हणाल्या, नगर शहरात खूपवेळा आले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले नगर शहर काही वर्षांपासून बदलत आहे. शहरातील सकल ब्राह्मण समाज एकत्र येवून चांगले काम करत आहे. त्यांना येथील आमदार संग्राम जगताप यांची साथ मिळत आहे. शहरात इन्फरमेशन टेक्नॉलॉजी सेंटर सुरु झाल्याने ऐकून आनंद होत आहे. आता नगर शहरही लवकरच डिजिटल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्तविक अ‍ॅड.प्रसन्न जोशी यांनी केले. स्वागत अमित गटणे यांनी केले. तर सुमित कुलकर्णी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन दिप्ती शुक्रे यांनी केले. यावेळी मंगेश निसळ, विजय देशपांडे, किशोर जोशी, मयुर जोशी, राजेश भालेराव, आबा ऐडके, राजा पोतदार, दिनेश जोशी, स्नेहा जोशी, उपेंद्र टोकेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post