राठोड-गांधींमध्ये मनोमिलन; भाजप कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात शिवसेना उपनेते अनिल राठोड व भाजप शहर जिल्हाध्यक्ष व माजी खासदार दिलीप गांधी यांच्यातील वाद संपुष्टात येवून मनोमिलन झाले आहे. आमच्यात कुठलेही वैयक्तिक वाद नव्हते, असे राठोड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. तर ‘देर हुई, दुरुस्त होई’ म्हणत गांधी यांनीही पुढील काळात एकत्रितपणे काम करण्याची भूमिका मांडली. दरम्यान, या मनोमिलनानंतर भाजप कार्यालयाबाहेर ‘युती’च्या विजयाच्या घोषणा देत फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
निवडणूक जाहीर झाल्यापासून शहर भाजप शिवसेनेच्या प्रचारापासून अलिप्त होती. दिलीप गांधी यांनीही तीन-चार दिवसांत भूमिका जाहीर करु असे म्हटले होते. बुधवारी (दि.16) सकाळी भाजप कार्यालयात गांधी व राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजपची एकत्रित बैठक झाली. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, विक्रम राठोड, राजेंद्र राठोड, दत्ता जाधव, संभाजी कदम, श्याम नळकांडे भाजपाचे किशोर डागवाले, किशोर बोरा, सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, हरिभाऊ डोळसे, प्रशांत मुथा, नरेश चव्हाण आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दिलीप सातपुते म्हणाले की, केंद्रात राज्यात शिवसेना लहान भाऊ आहे. भाजप मोठा भाऊ आहे. मात्र नगरमध्ये शिवसेना मोठा भाऊ आहे. मात्र आता कोणी लहान नाही व कोणीही मोठे नाही. आपल्याला आता एक दिलाने काम करायचे आहे.
अनिल राठोड म्हणाले की, मी भगवा झेंडा कधी खाली ठेवला नाही. निष्ठेने काम करत आहे. भाजप शिवसेनेने एक दिलाने काम केले, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मीच काय कोणीही निवडून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणुकीला आता चार दिवस राहिले आहेत. पण आपण एकत्र असल्यामुळे चार तासांमध्ये चार दिवसाचे काम करू शकतो. कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागांमध्ये मतदान घडवून आणण्यासाठी व महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी परिश्रम घ्यावे. पाच वर्षांमध्ये नगरची प्रतिमा धुळीला मिळाली. आता आपल्याला पुन्हा सत्ता आणायची आहे. केडगाव हत्याकांडामुळे नगरची बदनामी झाली आहे. सध्या भैय्या अनेक झाले आहेत. पण बॅलेट पेपरवर ‘भैय्या’ कोण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी स्वाभिमान जपला पाहिजे. विरोधी उमेदवारांकडून काही गडबड केली जात असेल, तर  तात्काळ त्याची माहिती आम्हाला द्यावी, असेही राठोड यांनी सांगितले.
पक्षाच्या विचाराला माननारे आम्ही आहोत. पक्षाच्या पलिकडे आम्ही जाऊ शकत नाही. आमच्या दोघांमध्ये वैयक्तिक वाद नाही. कार्यकर्त्यांमुळे काही वाद झाले असतील. मात्र, कार्यकर्त्यांनीच मोठा सहभाग देऊन हे मनोमिलन घडवून आणले. सर्वांनी एकत्र यावे, ही कार्यकर्त्यांचीच इच्छा होती. दरम्यान, मागील पाच वर्षात नगरचा बिहार झाला. एसपी ऑफीस फोडले गेले. खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले. हे सर्व आम्हाला आता थांबवायचे आहे, असेही राठोड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
दिलीप गांधी म्हणाले की, ‘देर हुई पर दुरुस्त हुई’, कोणत्याही गोष्टीला योग्य वेळ लागते. ती योग्य वेळ आता आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे. त्यांनी पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे केली आहेत. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकत्रित काम करतील. आपण एकत्र आलो आहोत. त्यामुळे विजय निश्चित आहे, असे त्यांनी बैठकीत सांगितले.
आदित्य ठाकरे यांची संवाद यात्रा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. येत्या पाच वर्षात शहरात झोपडीमुक्त नगर करायचे आहे. सर्वांना 2022 पर्यंत स्वतःचे घर द्यायचे आहे. अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या एकंदरीत विकासाच्या दृष्टीकोनातून केंद्राच्या व राज्याच्या सर्व योजना राबवायच्या आहेत. शहराला स्मार्टसिटीच्या दिशेने न्यायचे आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु. मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी दिला आहे. त्याचे प्रस्तावही तयार झाले आहेत. आपला स्वतःचा प्रतिनिधी असला तर मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी मिळेल, असे ते म्हणाले. शिवसेना व भाजपचा संयुक्त मेळावाही घेणार असल्याचेस गांधी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post