विखे, पिचड, पाचपुतेंसह नगरमधील सर्व विद्यमान आमदारांना भाजपची उमेदवारी


एएमसी मिरर : नगर
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पाचही विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तसेच गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार वैभव पिचड यांनाही भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे.
माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनाही पक्षाने श्रीगोंद्यातून पुन्हा संधी दिली आहे. शिवाजी कर्डिले यांना राहुरीतून, मोनिका राजळे यांना शेवगावमधून, बाळासाहेब मुरकुटे यांना नेवासामधून, स्नेहलता कोल्हे यांना कोपरगावमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. पालकमंत्री शिंदे कर्जत-जामखेड मधून रिंगणात उतरणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारीमध्ये दोन विद्यमानांचा पत्ता कट होणार अशी चर्चा होती. त्याला पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात भाजपने आठ उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेनेने भाऊसाहेब कांबळे व अनिल राठोड या दोघांना उमेदवारी दिली आहे. पारनेरमधून विजय औटी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सेनाभाजपकडून अद्याप उमेदवार दिला गेलेला नाही. थोरातांविरोधात युतीला सक्षम उमेदवार मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post