पराभवाचे आत्मपरीक्षण करण्याची गरज : खासदार सुजय विखे


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात अपयश का आले, याची कारणे शोधली जातील. आत्मपरीक्षण करण्याची आमच्या सर्वांना गरज आहे. या निकालापासून मला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. पराभव झाला याचे मला दुःखच आहे, असे सांगत विखेंच्या यंत्रणे संदर्भात अद्याप कुणीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही, त्यामुळे जर-तरच्या गोष्टीवर मी भाष्य करणे चुकीचे होईल, अशी स्पष्टोक्ती खासदार सुजय विखे यांनी दिली आहे. जिल्ह्यात 12-0 चा नारा हा उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी दिला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
खासदार विखे नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुजय विखे म्हणाले की, ग्रामीण भागांमध्ये आमचा पराभव झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. नगर जिल्ह्यातील पराभवाविषयी मला अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांनी काहीही विचारणा केलेली नाही. या संदर्भात पक्षपातळीवर समिती नेमलेली आहे. ते त्यांचा अहवाल देतील. भाजप पक्षावर कोणीही नाराज नाही. तसे असते तर राधाकृष्ण विखे हे 80 हजारांच्या मताधिक्याने कसे निवडून आले असते? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सोशल मीडियावर अथवा राजकीय विश्लेषक काय बोलतात, याच्याशी मला काही देणे घेणे नाही. विखे यांच्या यंत्रणेबाबत एखाद्याने जाहीरपणे, अधिकृतपणे वक्तव्य केलेले नाही. विखेंना मंत्रीपद देऊ नका, असेही कुणी अधिकृतपणे म्हटलेले नाही. जर एखाद्याने तसे वक्तव्य केले, तर त्याला निश्चितपणे उत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले. विखे कुटुंबाची ताकद काय आहे, हे सांगायची गरज नाही. त्याची चर्चाही करायची गरज नाही. आम्ही जनतेसाठी काम करत असतो. जी जबाबदारी देतील, ती आम्ही पार पाडत असतो. यावेळीही आमच्यावर जबाबदारी दिली होती, ती आम्ही पार पाडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी मुंबई येथे गेलो होतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पराभूत उमेदवार व आमच्यांत समन्वय नाही असे म्हणणे चुकीचे आहे, असेही विखे यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यातून जाऊन मुख्यमंत्र्यांना जे भेटलेत, त्यांची बंद खोलीत काय चर्चा झाली, यावर तर्कवितर्क लावण्यात अर्थ नाही. त्यांनी त्यांचे विषय मांडले असतील. मात्र, अजून अशी कोणाची भूमिका जाहीरपणे आलेली नाही. त्यामुळे भूमिका जाहीर झाल्यानंतर किंवा आल्यानंतर त्यावर बोलणे उचित होईल, असे मतही सुजय विखे यांनी पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post