राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेला गाळात घातले; उदयनराजेंची सडकून टीका


एएमसी मिरर : नगर
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेची फसवणूक केली आहे. मराठा समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवले. मराठा समाजाचा वापर फक्त राजकारणासाठी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेला गाळात घालण्याचे काम त्यांनी केले. आता त्याच गाळातून कमळ फुलले आहे, अशा शब्दांत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली.
राशीन येथे कर्जत-जामखेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा.राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत भोसले बोलत होते. उदयनराजे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात-राज्यात काँग्रेसचे राज्य होते. 50 वर्षे त्यांच्या हातात सत्ता दिला. स्व.गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असतांना त्यांची भेट घेऊन कृष्णा खोर्‍याच्या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर 1996 साली या प्रकल्पाला सुरूवात झाली. काँग्रेसच्या काळातच हा प्रकल्प सुरू होणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी केवळ लोकांचा वापर केला. 50 वर्षे त्यांनी केवळ घोषणा आणि राजकारणच केले. शिवसेना-भाजपनेच कृष्णा खोर्‍याचा प्रकल्प जन्माला घातला. मात्र, मुदतपूर्व निवडणुका झाल्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली. त्यानंतर हा प्रकल्प पुन्हा 15 वर्षे रखडला. 10 वर्षात प्रकल्प पूर्ण व्हायला होता. मात्र, केवळ त्यावर पैसा खर्च झाला. सर्वसामान्यांच्या कष्टाचा हा पैसा गेला कुठे? हा सवाल त्यांना विचारायलाच पाहिजे. गेली 50 वर्षे सर्वसामान्यांचा विचार न करता स्वतःची दिवाळी साजरी. मात्र, त्यांच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्यांचं ‘दिवाळं’ निघालं. विरोधकांना याचा जाब विचारायला पाहिजे. लोकांची दिशाभूल आणि जातीधर्माचे राजकारण त्यांनी केले. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीने केले. मराठा आरक्षणाबाबत त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. हे प्रश्न कधी त्यांनी हाताळलेच नाहीत. लोकांना झुलवत ठेवायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची एवढेच काम त्यांनी केले, असा आरोप त्यांनी केला.


उदयनराजे पुढे म्हणाले की, जनतेनी विचार करणे गरजेचे आहे. आघाडी आणि युतीच्या कार्यपध्दतीत फरक आहे. महात्मा गांधींनी पंचायत राजची संकल्पना मांडली. सत्तेचे विकेंद्री करायची फक्त भाषणेच केली. सत्तास्थाने मूठभर लोकांच्या हातात ठेवली. अहंकार निर्माण झाला. निवडून आल्यावर यांची भाषा बदलते. समाजामुळे आम्ही आहे म्हणणारे निवडून आल्यावर आमच्यामुये समाज आहे, असे म्हणतात. लोकांच्या रोजगाराचा विचार केला नाही. शेतीला पाणी कसे मिळेल, याचा विचार केला नाही. मात्र, मागील पाच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. या भागाचा विकास व्हावा, यासाठी 3248 कोटी रुपये मंजूर केले. येत्या दोन वर्षात साखर कारखानाही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जतसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मार्गी लावली. राशीनसाठी 13 कोटी मंजूर केले. रस्त्यांसाठी निधी आणला. राम शिंदे यांनी मात्र राजकारण न करता कायम समाजकारण केले. जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार्‍या राम शिंदे यांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम केले. जनतेनी आता तरुण पिढीचा विचार करावा. त्यांची स्वप्ने सत्यात आणण्यासाठी युतीला साथ द्यावी. तरुणांचे स्वप्न पूर्ण करण्याचे व्हिजन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आहे, असेही ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना त्यांनी राज्य बँकेतील घोटाळ्याच्या चौकशीच्या आदेशावर सही केली. त्यांनीही घोटाळा झाल्याचे मान्य केले. आज जे विरोधक समोर उभे आहेत, तेही यात अडकतील अशी शक्यता, आहे असे म्हणत त्यांनी पवारांवर थेट निषाणा साधला. जगाची नाही तर मनाची तरी त्यांनी ठेवायला हवी होती, असा टोलाही त्यांनी लगावला. खर्‍या अर्थाने यांनी लोकांचा विचार केला असता तर आत्मचिंत, आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, अशी टीकाही त्यांनी अजित पवार यांच्यावर केली. यांचा आता फार विचार करायची वेळ राहिली नाही. काय करायचे हेच त्यांना कळत नाही. कधी मुस्काटात मारतात, कधी कोपरे मारतात, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले.प्रा. राम शिंदे म्हणाले की, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मी जनतेचा गडी म्हणून काम केले आहे. जनतेच्या उत्कर्ष करण्यासाठी अहोरात्र सेवा करणार असून, विरोधकांच्या मागे ईडीची चौकशी लागली आहे. त्यामुळे पुढील उमेदवार कधीही जेलमध्ये जाऊ शकतो. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. पुढील काळामध्ये फाईव्ह स्टार एमआयडीसी उभारून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. ही निवडणूक आता जनतेनेच हाती घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक राजेंद्र देशमुख यांनी केले. यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री महामंत्री विजयराव पुराणिक, विजयकुमार देशमुख, राजेंद्र देशमुख, जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, नामदेव राऊत, अल्लाउद्दिन काझी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बळीराम यादव, विक्रम राजेभोसले, पप्पू शहाणे, पंचायत समितीच्या सभापती साधना कदम, नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे, राशीनच्या सरपंच नीलम भीमराव साळवे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, कांचन खेत्रे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post