उत्तरेतील पिता-पुत्रांनी राजीनामा द्यावा; विखेंविरोधात भाजपांतर्गत नाराजी चव्हाट्यावर


एएमसी मिरर : नगर 
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीच्या दारुण पराभवानंतर आता विखे पितापुत्रांविरोधात भारतीय जनता पक्षातच नाराजी पसरल्याचे चित्र आहे. भाजपच्या नगर शहर जिल्हा उपाध्यक्षांनी विखे पिता-पुत्रांचा नामोल्लेख टाळून टीका करत नैतिक जबाबदारी स्वीकारुन खासदारकी व आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच विखेंना कोणतेही मंत्रिपद अथवा महामंडळ, मोठे पद देऊ नये, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे व पक्षाच्या नेत्यांकडे केली असल्याचे त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हाजी अन्वर खान यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. पत्रकात म्हटले की, उत्तरेकडील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या पोषक वातावरणाचा फायदा घेत पक्ष नेतृत्वाला खोटी आश्वासने देवून आपल्या चिरंजिवांचा बालहट्ट पूर्ण केला. मात्र, आपल्यापेक्षा कोणीही वरचढ होऊ नये ही परंपरा कायम राखत त्यांनी जिल्ह्यातील महायुतीचे अनेक मंत्री - आमदारांना घरी पाठवण्याचे दुष्कृत्य या पिता-पुत्राने केले. मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक संबोधले जाणार्‍या मंत्री महोदयांना (गिरीश महाजन!) हेलिकॉप्टरद्वारे अहमदनगर ते मुंबईपर्यंत सफर घडवतांना सोबत बॅग (कपडे - कागदपत्रांची!) घेऊन फिरले. त्यांना संपूर्ण दिशाभूल करणारी माहिती दिली. जिल्ह्यातील भाजप-शिवसेना महायुतीला पोषक असलेले वातावरण खराब केले. स्वत:च्या पुढे कोणी जाऊ नये. महत्त्वाचे मंत्री पद, पालकमंत्री पद आपल्याला मिळावे, हेच यामागचे कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील मंत्री, आमदारांनी या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडून खासदारकीच्या निवडणुकीत जीवाचे रान केले. आपल्याला या पिता-पुत्रांची मोठी मदत विधानसभा निवडणुकीत होईल, या आशेने प्रामाणिकपणे काम करुन मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. परंतु या सर्वांची घोर निराशा उत्तरेतील पिता-पुत्राने केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यांना कोणतेही मोठे पद, मंत्रीपद अथवा महामंडळ देऊ नये, अशी मागणीही पक्षाध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे अन्वर खान यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात पक्षाची पिछेहाट झाली असून, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी खासदारकी व आमदारकीचा त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post