चंद्रकांत पाटलांनी 'कोथरूड'मधून माघार घ्यावी; ब्राह्मण महासंघाची मागणी


एएमसी मिरर : वेब न्यूज
चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच मंत्रिपद देखील आहे. ते संघटनेमध्ये चांगले काम करत आहेत. हे पाहता पक्षाकडून त्यांना आगामी काळात विधानपरिषद किंवा राज्यसभेवर देखील संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माघार घ्यावी व समाजाच्या उमेदवारास पाठिंबा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आज पुण्यात बैठक पार पडली. त्यानंतर गोविंद कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना ही भूमिका व्यक्त केली.

गोविंद कुलकर्णी म्हणाले की, आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली गेली आहे. तरी आम्ही पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक घेऊन, उद्या दुपारपर्यंत चंद्रकांत पाटील यांना आमचा निर्णय सांगणार आहोत. ब्राम्हण महासंघाच्या काही मागण्या असून परशुराम विकास महामंडळ तयार करावे, पौराहित्य करणाऱ्या पुरोहिताना मानधन दिले जावे, ब्राह्मण समाजातील महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कायदा करावा आदींचा यात प्रामुख्याने समावेश आहे. याविषयी त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली असल्याची त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post